कोरोना चीनमध्ये अन्‌ दहशत पंढरपूरातील गावात

भारत नागणे
Saturday, 8 February 2020

सोने- चांदी व्यवसायाच्या निमित्ताने उपरी येथील अऩेक कुटुंबे केरळ राज्यातील विविध प्रांतात स्थायिक झाली आहेत. केरळात कोरोना व्हायरसची साथ आल्याची माहिती मिळल्यापासून येथील ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. दरम्यान येथील केरळात असलेले सर्वजण व्यवस्थित असल्याची माहिती आहे.

पंढरपूर (सोलापूर) : जिवघेण्या कोरोना व्हायसरने संपूर्ण चीन हादरला आहे. अशातच या संसर्गजन्य रोगाची साथ भारतात केरळमध्ये पसरु लागली आहे. या संदर्भात केरळमध्ये आरोग्य विभागाने हायअलर्ट ही लागू केला आहे. अशा परिस्थितीमध्ये उपरी (ता. पंढरपूर) गावातील ग्रामस्थ मात्र आठ दिवसांपासून कोरोनाच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. 
सोने- चांदी व्यवसायाच्या निमित्ताने उपरी येथील अऩेक कुटुंबे केरळ राज्यातील विविध प्रांतात स्थायिक झाली आहेत. केरळात कोरोना व्हायरसची साथ आल्याची माहिती मिळल्यापासून येथील ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. दरम्यान येथील केरळात असलेले सर्वजण व्यवस्थित असल्याची माहिती आहे.
उपरी येथील सुमारे 80 ते 90 तरुण सोने- चांदी व्यवसायाच्या निमित्ताने केरळातील त्रिशूर, पट्टांबी, पुन्नमकोळम, मलपूरम, कोयलांडी, तीरुर अशा विविध भागात गेल्या अनेक वर्षापासून राहतात. गेल्या आठ दिवसांपासून चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायारसची चर्चा माध्यमातून सुरु आहे. याच जीवघेण्या कोरोनाचे रुग्म केरळ राज्यात आढळून आले आहेत. केरळात कोरोनाची साथ आल्याची माहिती समजताच उपरी येथील अनेकांनी तेथील लोकांशी संपर्क साधून विचारपूस केली. दोन दिवसांपासून कोरोना विषयी अधिकच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक दहशतीखाली असून येथील अनेकांनी देवाकडे धावा देखील केला आहे.
पंढरपूरसह सांगोला, आटपाडी,  जत, म्हसवड, माळशिरस या भागातील अनेक जण व्यवसायाच्या निमित्ताने केरळमध्ये आहेत. त्यामुळे केराळात आलेल्या कोरोनाची या भागातील लोकांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान केरळमध्ये जे लोक आहेत. ते सुस्थितीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा सध्यातरी त्रास नाही. त्यांच्याशी दररोज सकाळी आणि संध्याकाळी संपर्क सुरु आहे. गर्दीत कुठे बाहेर पडू नका अशा सूचनाही त्यांना केल्या जात आहेत. अशी माहिती येथील त्रिमूर्ती ज्वलर्सचे संभाजी नागणे आणि पुजा ज्वेलर्सचे सुभाष नागणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona terror in Upari village of Solapur district