आशादायी..! "या' महापालिकेच्या नगरसेवकांनी केला प्रभाग कोरोनामुक्‍तीचा संकल्प; तीन प्रभागांत रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी 

Antigen
Antigen
Updated on

सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक 11, 20 आणि 22 हे तीन प्रभाग वगळता अन्य प्रभागांमधील रुग्णसंख्या 100 पेक्षा अधिक झाली आहे. तर तीन, पाच आणि 24 या प्रभागांमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या जोडीला आता नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह गंभीर आजार असलेल्यांची टेस्ट व्हावी, त्यांचे वेळेत निदान व्हावे म्हणून घरोघरी सर्व्हे सुरू केला आहे. 

शहरात 16 ते 26 जुलै या काळात पुन्हा कडक संचारबंदी लागू केली. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून झोपडपट्टीतील संसर्ग आता अपार्टमेंट अन्‌ बंग्लोजमध्ये पोचला आहे. दुसरीकडे, मृत्यूचे प्रमाणही कमी झाले नाही. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांचे लवकर निदान व्हावे, त्यांच्यावर वेळेत उपचार करता यावेत, या हेतूने रॅपिड अँटिजेन टेस्टवर भर दिला जात आहे. महापौर श्रीकांचना यन्नम, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, अमित पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनीही प्रभागांमध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यावर भर दिला आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी महापालिका अन्‌ पोलिस प्रशासनासोबत स्थानिक नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग कमी होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. 

याबाबत नगरसेवक प्रथमेश कोठे म्हणाले, विडी घरकुल परिसरात घरोघरी सर्व्हे सुरू केला आहे. दररोज शंभर व्यक्‍तींची टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रभाग दहा व अकरामध्ये आतापर्यंत 600 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट पूर्ण झाली आहे. नगरसेवक महेश कोठे यांनीही त्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. 

नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले, प्रभाग पाचमध्ये अँटिजेन टेस्टवर भर दिला आहे. जनजागृती करणे, अँटिजेन टेस्टचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मिलिंद नगर, जय मल्हार चौक आणि अण्णा भाऊ साठे चौक परिसरात मागील 25 दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. गणेश पुजारी, ज्योती बमगोंडे यांनीही त्यासाठी परिश्रम घेतले. 

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, आपला प्रभाग स्वच्छ, निरोगी राहावा यासाठी नागरिकांच्या मदतीने प्रभाग कोरोनामुक्‍त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांना अँटिजेन टेस्ट करण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांसह अन्य नगरसेवकांच्या मदतीने निश्‍चितपणे प्रभाग कोरोनामुक्‍त होईल. 

नगरसेवक गणेश वानकर म्हणाले, महापालिकेच्या वतीने अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक सहामधील बहुतांश नागरिकांनी ही टेस्ट करून घ्यावी, यासाठी घरोघरी जनजागृती केली जात आहे. प्रभाग समितीचे अध्यक्ष म्हणून झोनमध्ये बैठकाही घेतल्या जात आहेत. ज्योती खटके यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

नगरसेविका फिरदोस पटेल म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 16 मधील मौलाली चौक, गांधीनगर, लष्कर, आंबेडकर नगरात अँटिजेन टेस्ट केली आहे. नागरिकांच्या मनात भीती असून गैरसमज दूर करून त्यांची टेस्ट केली जात आहे. त्यासाठी नगरसेवक संतोष भोसले, नागेश कोळी, नगरसेविका मीनाक्षी कंपली यांच्यासह कार्यकर्तेही मदत करीत आहेत. 

नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले, प्रभाग क्रमांक नऊमधील सर्वच नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. भवानी पेठ, रविवार पेठ यासह अन्य भागातील नागरिकांची टेस्ट केली आहे. नगरसेवक अविनाश बोमड्याल, नगरसेविका रामेश्‍वरी बिर्रु, राधिका पोसा यांनीही पुढाकार घेतला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com