प्रेमी युगुलांनी सोडला नाही शेवटपर्यंत हात ! एकाच स्कार्फने घेतला गळफास

चंद्रकांत देवकते 
Thursday, 7 January 2021

अगोदर झाडाच्या फांदीवर दोघांनी बसून स्कार्फने गळ्याला घट्ट गाठी मारल्या होत्या व अलगदपणे फांदीखाली घसरल्यानंतरही एकमेकांच्या हातात हात घालून चेहरा समोरासमोर राहील याची खबरदारी घेतली होती. या प्रेमी युगुलांनी आपल्या प्रेमाचा दुःखद अंतही प्रेमविरह सहन न करता केल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. 

मोहोळ (सोलापूर) : येथील सोलापूर हायवे लगत असलेल्या बी. पी. एड. कॉलेजच्या आवारातील चिंचेच्या झाडाच्या फांदीला प्रियकर व प्रेयसीने तोंडाला बांधायच्या स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन जवळील उजनी वसाहतीजवळील स्वत:च्या शेतात राहणाऱ्या भूषण (भैय्या) धनंजय पडवळकर (वय 19) व जवळच राहणाऱ्या 17 वर्षांची मुलगी या दोघांनी बुधवारी (ता. 6) दुपारी 12.30 च्या दरम्यान चिंचेच्या झाडाच्या फांदीला एकाच स्कार्फने गळफास घेत आत्महत्या केली. 

याबाबत पोलिस स्टेशनला खबर देताना मृत भूषण ऊर्फ भैय्या पडवळकर याचे चुलते संजय विलास पडवळकर यांनी माहिती दिली, की नेहमीप्रमाणे सकाळी उठून भैय्या शेतात शेती कामासाठी गेला होता. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान डोक्‍याचे केस कमी करून येतो म्हणून तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर दुपारी सव्वा तीनला योगेश बंडगर या नातेवाइकाचा मोबाईलवरून फोन आला, की तुमच्या पुतण्या व एक मुलगी बी. पी. एड. कॉलेजजवळ झाडाला गळफास घेतला आहे. तत्काळ घरातील भाऊ व कुटुंबीयातीत इतर सदस्यांसह घटनास्थळाजवळ पोचलो तर पुतण्या भैय्या व त्याच्या सोबत फास घेतलेली मुलगी पाहिली. 

संजय पडवळकर यांच्या फिर्यादीनुसार, पुतण्या भैय्या व मृत मुलगी यांचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती घटनास्थळावरील गर्दीतील काही जणांनी सांगितली. गळफास घेतलेले युवक व युवती या वेगवेगळ्या जातीच्या असून, कदाचित आपल्या प्रेमाला घरातील माणसे पाठिंबा देतील का, या भीतिपोटी प्रेमी युगुलांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा, अशी दबकी चर्चा बघ्यांतून होत होती. 

घटनास्थळावरील दृश्‍य एवढे विदारक होते, की अगोदर झाडाच्या फांदीवर दोघांनी बसून स्कार्फने गळ्याला घट्ट गाठी मारल्या होत्या व अलगदपणे फांदीखाली घसरल्यानंतरही एकमेकांच्या हातात हात घालून चेहरा समोरासमोर राहील याची खबरदारी घेतली होती. या प्रेमी युगुलांनी आपल्या प्रेमाचा दुःखद अंतही प्रेमविरह सहन न करता केल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple died tragically at Mohol