पोलिस कोठडीत मारता.... आत्ता घ्या...

पोलिस कोठडीत मारता.... आत्ता घ्या...

पंढरपूर (जि. सोलापूर) : पोलिस कोठडीतील एका संशयित आरोपीस मारहाण केल्याप्रकरणी करकंब पोलिस ठाण्यातील एपीआय प्रशांत पाटीलसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
याबाबतची माहिती अशी, की पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे जमिनीच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. त्यानुसार दादासाहेब चव्हाण याच्यावर करकंब पोलिस ठाण्यात 307, 362, 324 या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यास सर्वप्रथम 7 डिसेंबर 2019 रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर त्यास पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याने पोलिसांविरोधात मारहाणीची लेखी आणि तोंडी तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. पी. कराड यांच्यासमोर दिली होती. त्यानंतर न्यायदंडाधिकारी यांनी दादासाहेब चव्हाण याची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. 
वैद्यकीय तपासणीत दादासाहेब चव्हाण याला गंभीर मारहाण झाल्याचे समोर आल्यानंतर तो अहवाल सोलापूर जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे 10 डिसेंबर रोजी पाठविण्यात आला. त्यानंतर सोलापूर जिल्हा न्यायाधीशांनी पंढरपूर न्यायालयात सविस्तर पत्र लिहून आरोपीच्या जबाबाप्रमाणे पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुन्हा पंढरपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 10 डिसेंबर 2019 व 17 जानेवारी 2020 रोजी आरोपीचा पुन्हा जबाब नोंदवून घेतला होता. यामध्ये आरोपी दादासाहेब चव्हाण याने करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील व पोलिस कॉन्स्टेबल दादासाहेब सूळ यांनी त्यास शिवीगाळ केली. एपीआय पाटील यांनी मान पकडली तर सूळ यांनी काठीने मारले. दुसरे पोलिस कॉन्स्टेबल अरुण कोळवले यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिला होता. 
सोमवारी (ता. 27) आरोपीचा जबाब, वैद्यकीय अहवाल व जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलिस कॉन्स्टेबल दादा सूळ, अरुण कोळवले यांच्यावर आयपीसी कलम 324, 504, भादंवि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. पी. कराड यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com