सांगोला तालुक्‍यात शेततळ्यात बुडून चुलत बहिणींचा मृत्यू 

दत्तात्रय खंडागळे 
Wednesday, 21 October 2020

घरातील सर्व लहान मुले घरासमोरच खेळत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस आल्याने सर्वजण घरी आले. परंतु तनुजा मच्छिंद्र कोकरे (वय 6) व सायली सुभाष कोकरे (वय 8) या दोन चुलत बहिणी मात्र घरी आल्या नाही. 

सांगोला (सोलापूर) : खेळत-खेळत घराशेजारी असणाऱ्या शेततळ्यामधील पाण्यात पडून दोन चुलत बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वझरे (ता. सांगोला) येथे घडली आहे. तनुजा मच्छिंद्र कोकरे (वय 6 वर्षे) व सायली सुभाष कोकरे (वय 8 वर्षे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या चुलत बहिणीची नावे होत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र गणपत कोकरे (रा. वझरे, ता. सांगोला) हे आपल्या दोन भावांसह पुणे येथे ड्रायव्हर म्हणून काम करतात. सध्या लॉकडाउनच्या काळात ते गावी राहण्यासाठी असतात. ता. 20 ऑक्‍टोबर रोजी मच्छिंद्र कोकरे हे त्यांचे भाऊ, पत्नी सर्वजण शेतामध्ये काम करत होते. यावेळी घरातील सर्व लहान मुले घरासमोरच खेळत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस आल्याने सर्वजण घरी आले. परंतु तनुजा मच्छिंद्र कोकरे (वय 6) व सायली सुभाष कोकरे (वय 8) या दोन चुलत बहिणी मात्र घरी आल्या नाही. 

घरातील सर्वांनी आजूबाजूला शोध सुरु केला. तसेच घरापासून 200 मीटर अंतरावर शेजारीच असणारे धर्मा भगवान वाकडे यांच्या शेततळ्याचीही पाहणी केली असता तनुजा ही पाण्यावर तरंगत असलेली दिसली. त्यावेळी तिला बाहेर काढले. तसेच दुसऱ्या मुलीस 21 ऑक्‍टोबर रोजी रात्री दोनच्या सुमारास अजनाळे येथील एका व्यक्तीने पाणबुडीच्या साह्याने पाण्यात जाऊन बाहेर काढले. मच्छिंद्र गणपत कोकरे यांनी दोन चुलत बहिणींचा शेततळ्यातील पाण्यात पडुन बुडून मृत्यू झाल्याची माहिती सांगोला पोलिसात दिली आहे. या दुर्दैवी घटनेने वझरे परिसरात शोककळा पसरली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cousin sister drowned in a farm Ponds in Sangola taluka