जनावरे शेतात आल्याने कोयत्याने मारहाण; तिघे जखमी ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

मोहोळ तालुक्‍यातील आष्टी येथे शेतात जनावरे आल्याच्या कारणावरून सोन्याबापू लक्ष्मण व्यवहारे व इतरांनी काठी व कोयत्याने मारहाण केल्याने सोनाली हणमंत व्यवहारे (वय 17), जयश्री हणमंत व्यवहारे (वय 15) आणि आदित्य हणमंत व्यवहारे (वय 15) हे सर्वजण गंभीर जखमी झाले. यासह शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना. 

सोलापूर : मोहोळ तालुक्‍यातील आष्टी येथे शेतात जनावरे आल्याच्या कारणावरून सोन्याबापू लक्ष्मण व्यवहारे व इतरांनी काठी व कोयत्याने मारहाण केल्याने सोनाली हणमंत व्यवहारे (वय 17), जयश्री हणमंत व्यवहारे (वय 15) आणि आदित्य हणमंत व्यवहारे (वय 15) हे सर्वजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

भिंतीवरून पडून तरूणाचा मृत्यू 
मोहोळ तालुक्‍यातील देवडी येथे घराच्या भिंतीवरून उतरत असताना तोल जाऊन पडल्याने सागर राजेंद्र थोरात (वय 35) या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मंगळवारी सकाळी सागर थोरात हा घरात भिंतीवरून उतरत असताना पडल्याने त्याच्या डोक्‍यास मुकामार लागून तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी अनंता थोरात यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

दुचाकी घसरल्याने तरुण जखमी 
निंबर्गी ते सोलापूर रस्त्याने दुचाकीवरून येताना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तेरा मैल येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सोनू राजकुमार घोडके (वय 21, रा. पंजाब तालीम, अक्‍कलकोट) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत सोनू घोडके यास उपचारासाठी गुड्डे या नातेवाइकाने त्यास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

उसाच्या फडात तरुणाने केले विष प्राशन 
मंगळवेढा तालुक्‍यातील सरकोली येथे उसाच्या फडात अशोक शांतीनाथ घुले (वय 25, रा. श्रीपुरा टाकळी, ता. केज, जि. बीड) याने मंगळवारी सकाळी दारूच्या नशेत गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. घुले यास त्रास होऊ लागल्यावर त्यास उपचारासाठी लक्ष्मण घुले यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

दारूच्या नशेत दुचाकीस्वाराची धडक, वादावादीत दोघे जखमी 
शहरातील कल्पना टॉकीजजवळील एमएसईबी कार्यालयासमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर झालेल्या वादावादीत दोघेजण जखमी झाले. वैभव वासुदेव जाधव (वय 28, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) आणि संतोष दत्तात्रय जाधव (वय 38, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) अशी जखमींची नावे असून, दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city