पंढरपुरात वाळू चोरांवर कारवाई, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

शेळवे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळूमाफिया विरोधात एसपीच्या वाळूचोरी विरोधी पथकाने बुधवारी (ता. 5) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी 22 लाख 42 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 10 वाळू चोरांविरोधात तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर) ः शेळवे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळूमाफिया विरोधात एसपीच्या वाळूचोरी विरोधी पथकाने बुधवारी (ता. 5) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी 22 लाख 42 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 10 वाळू चोरांविरोधात तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेळवे, वाडीकुरोली, पिराचीकुरोली, खेडभाळवणी, शिरढोण या भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि चोरी सुरू असल्याची माहिती वाळूचोरी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास शेळवे भीमा नदीपात्रात छापा टाकून कारवाई केली. यावेळी पाच ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने वाळू उपसा आणि वाहतूक करून चोरी करत असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी वाळूने भरलेले पाचही ट्रॅक्‍टर जप्त केले. 
शेळवे येथील सुनील पाटील, बालाजी गाजरे, वसंत गाजरे, श्रीयश गाजरे, बाळासाहेब गाजरे, प्रशांत गाजरे, अर्जून लोखंडे, शाहीद शेख यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलिसांनी वाळूचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार आर. टी. जाधव करत आहेत. 

ब्रह्मपुरीत कोयत्याने एकास मारहाण 
मंगळवेढा ः टमटममध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणाऱ्या उसाच्या वाढ्याचे माप कमी का टाकतो, असे विचारल्याने हातातील ऊसतोडणीच्या कोयत्याने एकास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्‍यातील ब्रह्मपुरी येथील डोके यांच्या शेतात घडली. 
याबाबतची फिर्याद सागर अंबादास घाडगे (रा. भोसे) यांनी दिली आहे. स्वतःच्या ताब्यातील टमटम (एमएच 13 सीयू 7480) वाहनात उसाचे वाढे भरण्यासाठी ब्रह्मपुरी येथे गेल्यानंतर माप टाकण्यावरून हा वाद झाला. त्यात संशयित आरोपी ऊस तोडणी मुकदम धनाजी पांढरे (रा. तळसंगी) यांनी कोयत्याने मारहाण करून जखमी केले.

पंढरपुरात हिसका देऊन मंगळसूत्र चोरले 
पंढरपूर ः सकाळी रस्त्याने फिरायल्या निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसका देऊन चोरून नेले. ही घटना गुरुवारी (ता. 6) पहाटे पाच वाजणेच्या सुमारास टाकळी (ता. पंढरपूर) येथील अण्णाभाऊ साठे प्रशालेजवळ घडली. याप्रकरणी अश्‍विनी बाळासाहेब काकडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अश्‍विनी काकडे व त्यांच्या जाऊ मनीषा या दोघी गुरुवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमारास शाहूनगर ते टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. तेव्हा मागून दोघे दुचाकीवर आले. पुढेच गाडी आडवी लावून काही समजण्याच्या आताच दोघा अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र व हातातील व्हिवो कंपनीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर करत आहेत. 

वाढेगावात एकास मारहाण 
सांगोला : तू इथे थांबू नकोस असे म्हणून एकाने शिवीगाळ करून काठीने दंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना वाढेगाव (ता. सांगोला) येथे घडली आहे. अजिनाथ तातू गेजगे (वय 45, रा. वाढेगाव, ता. सांगोला) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. अजिनाथ गेजगे मंगळवारी दुपारी दोन वाजता वाढेगाव चौकातील कुंभार हॉटेलजवळ थांबले असता भानुदास हजारे (रा. वाढेगाव, ता. सांगोला) याने तू इथे थांबू नकोस असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. याबाबत अजिनाथ तातू गेजगे यांनी भानुदास हजारे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news from solapur district