कोरोनाच्या संकटात पाणी लागून पिकेही संकटात; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

हुकूम मुलाणी 
Friday, 4 September 2020

दुष्काळी मंगळवेढा तालुक्‍यामध्ये दरवर्षी खरीप पिकाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके खराब झाल्याची आजपर्यंतची परिस्थिती आहे. यंदा मात्र पावसाने तालुक्‍यात वेळेवर व अपेक्षेपेक्षा चांगली हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र सपाट जमिनीमध्ये असलेली पिके सध्या पाण्याखाली गेली आहेत. 

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना संकटाचा सामना करण्यात प्रशासन व्यस्त असताना, शेतकऱ्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच पाणी लागून खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीकडे अद्याप कोणीच लक्ष दिले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा : वडिलांनी स्वप्न दाखवले अन्‌ मुलाने केले पूर्ण; मुलगा अप्पर पोलिस अधीक्षकपदी ! 

दुष्काळी मंगळवेढा तालुक्‍यामध्ये दरवर्षी खरीप पिकाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके खराब झाल्याची आजपर्यंतची परिस्थिती आहे. यंदा मात्र पावसाने तालुक्‍यात वेळेवर व अपेक्षेपेक्षा चांगली हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र सपाट जमिनीमध्ये असलेली पिके सध्या पाण्याखाली गेली आहेत. खरीप हंगामामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मूग, मका ही पिके घेतली जात असून, खरीप पीक विमाचा विमा भरताना तालुक्‍यामध्ये सूर्यफुलाचे पीक क्षेत्र असतानादेखील विमा कंपनीने व शासनाने सूर्यफुलाचे पीक वगळले आहे. अशा परिस्थितीत सध्या बहुतांश शेतकऱ्यांची पिके सध्या पाण्याखाली गेली आहेत. 

हेही वाचा : एसटीत बसलेले प्रवासी करताहेत कोराना सुरक्षा नियमांची पायमल्ली 

या पाण्याखाली गेलेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल खाते व कृषी खात्याने अद्यापही नियोजन केले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. गतवर्षी रब्बीच्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करताना कृषी व महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना वगळले. परंतु विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाही विमा कंपनीने विमा दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांना ना शासनाची भरपाई मिळाली ना विमा कंपनीची. त्यामुळे शेतकरी अशा दुहेरी संकटात सापडले. 

सध्या महसूल खाते कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात व्यस्त आहे. महसूल खात्यामध्ये तलाठ्याची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे कोविड सेंटर व गाव पातळीवरील कोरोना उपाययोजना करण्यात हे खाते गुंतल्यामुळे त्यांना नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ नाही. परंतु कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याकडे लक्ष दिले नाही. झालेल्या नुकसानीची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली नाही. याबाबत शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

सध्या ऑगस्टअखेर तालुक्‍यामध्ये महसूल मंडळामध्ये नोंद झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलिमीटरमध्ये) : मंगळवेढा 374.5, मारापूर 416, मरवडे 315, आंधळगाव 262, भोसे 129, हुलजंती 222, बोराळे 478. 

भाळवणीचे शेतकरी पंढरी दोडके म्हणाले, कमी क्षेत्र असलेल्या शेतात पेरणी केलेला मका पूर्णपणे पाण्यात गेल्यामुळे नुकसान झाले आहे. अद्यापही कोणी याकडे लक्ष दिले नसल्यामुळे कोरोनाच्या संकटात शेतीदेखील संकटात सापडली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops in Mangalwedha taluka were severely damaged due to waterlogging