बार्शी तालुक्‍यात बंधारे, तलावांचे कोट्यावधींचे नुकसान; दुरुस्तीसाठी लागणार अडीच कोटी 

Dams in Barshi taluka loss of crores of lakes Two and a half crore will be required for repairs
Dams in Barshi taluka loss of crores of lakes Two and a half crore will be required for repairs

बार्शी (सोलापूर) : कोरोनाचे संकट थोडे ओसरताना दिसत असतानाच बार्शी शहर व तालुक्‍यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने तसेच 14 ऑक्‍टोबर रोजी अतिवृष्टी झाल्याने तालुक्‍यातील 35 ठिकाणांचे सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, गावतळे यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून नवे संकट ओढवले आहे. देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून किमान 2 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत लागणार आहे. 

तालुक्‍यातील सौंदरे येथील 4, शेंद्री येथील 3, इंदापूर, उंबरगे, वांगरवाडी, येथील प्रत्येकी दोन, कासारवाडी, रातंजन, आगळगाव, खांडवी, सावरगाव, बोरगाव झाडी, शेळगाव (आर), येथील प्रत्येकी एक सिमेंट बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यामध्ये शेलगाव (मा), संगमनेर, पिंपळगाव (धस), शेळगाव (आर), कळंबवाडी (पा), रऊळगाव येथील मातीची बाजू, भराव, ताली फुटून गेल्या आहेत. भराव वाहून गेले आहेत. मुंगशी (आर) तलावाचा उजव्या बाजूने भराव फुटला असून खचल्याने गळती सुरु आहे. गुळपोळी, मालवंडी, कोरफळे येथील भरावातून गळती होत आहे तर कोरफळे येथील तोरटमुळी पाझर तलावाचा खालच्या बाजूने भराव खचला आहे. लाडोळे येथील पाझर तलावाचा भराव मधूनच फुटला आहे तर कळंबवाडी (पा) येथील गाव तळ्याच्या भरावतून गळती होत आहे. 

बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात सलग चार दिवस पाऊस, परत एकाच दिवसात अतिवृष्टी झाल्याने नद्या, ओढे, नाले तुडूंब भरुन वाहू लागले. पात्र सोडून वाहण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. शेतीतील माती, फळबागा, पिकांचे तर नुकसान झालेच पण शेतातील तालीदेखील फुटल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. बार्शी तालुक्‍यात डोंगराळ भाग असल्यामुळे पुढील वर्षांपर्यंत या सर्व बंधाऱ्यांची, तलावांची, गावतळे यांच्या भरावाची, गळतीची कामे पूर्ण होणे आवश्‍यक आहे अन्यथा पाणी पुन्हा वाहून जाईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

लघुपाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी एम. एम. सोनवणे म्हणाले, तालुक्‍यातील सिमेंट बंधारे 23, कोल्हापूर बंधारे 6, गावतळे 1, गावतलाव 1 यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा पाझर तलावाच्या भरावातून गळती होत आहे. या सर्व कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी किमान 2 कोटी 50 लाख रुपयांची आवश्‍यकता आहे. शासनाकडे अहवाल सादर केला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com