"या' कार्यकर्त्यांवर लाठीमार; संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी 

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 10 August 2020

9 ऑगस्ट क्रांतिदिनी सोलापूर येथील श्रमिक कष्टकऱ्यांनी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शारीरिक अंतर ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला देण्यात येणार होते. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. या  लाठीमारमध्ये शंभरहून अधिक आंदोलक जखमी झाले. त्यात युसूफ मेजर, दाऊद शेख, रवींद्र गेंट्याल, बापू साबळे, विजय हरसुरे, दीपक निकंबे, अनिल वासम, किशोर गुंडला, भूमेश अधेली, राजू गड्डम यांचा समावेश आहे.

सोलापूर : मोदी सरकारच्या जनता विरोधी आणि कामगार कायद्यातील प्रतिगामी बदलाच्या विरोधात नऊ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त देशव्यापी भारत बचाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुषंगाने सोलापुरात अत्यंत शांततेत आंदोलन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून कामगारांवर व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व संबंधित अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम व सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांनी केली. 

हेही वाचा : "या' कोसळलेल्या उद्योगाला हवी "ट्रॅक चेंज'ची गरज; अन्यथा... 

या घटनेबाबत ई-मेलमार्फत निवेदन दिले असून, निवेदनात पुढील गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. अखिल भारतीय कामगार संघटना, किसान व शेतमजूर संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार 9 ऑगस्ट क्रांतिदिनी सोलापूर येथील श्रमिक कष्टकऱ्यांनी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शारीरिक अंतर ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला देण्यात येणार होते. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारमध्ये शंभरहून अधिक आंदोलक जखमी झाले. त्यात युसूफ मेजर, दाऊद शेख, रवींद्र गेंट्याल, बापू साबळे, विजय हरसुरे, दीपक निकंबे, अनिल वासम, किशोर गुंडला, भूमेश अधेली, राजू गड्डम यांचा समावेश आहे. 

हेही वाचा : जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीशी जळळीक चर्चेचा विषय 

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी व प्रगत राज्यात अशी बाब निंदनीय आहे व त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. कोरोना महामारीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन करताना जनतेच्या एका मोठ्या वर्गाला अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. त्यासाठी त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून काही मदतीची अपेक्षा करत यापूर्वीही शांततेने व संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून आंदोलने केली. परंतु त्याची दखल अद्याप घेण्यात आली नसल्याने क्रांती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन होणार होते. परंतु ज्या पद्धतीने पोलिसांची दडपशाही झाली, ती पाहता सर्वसामान्य जनतेमध्ये आक्रोश वाढला आहे. शहरातील सर्वच पोलिस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या जनतेला मज्जाव करणे, त्यांची वाहने जप्त करणे, त्यांच्याशी अरेरावी करून अटकाव करणे, बळाचा वापर करून लाठीचार्ज करणे व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास मज्जाव करणे या घटना अधिक संताप आणणाऱ्या व सर्वसामान्य जनतेच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. या बाबींची चौकशी करून योग्य त्या कारवाईचे आदेश व्हावेत. तसेच सोबतच्या निवेदनातील राज्य सरकारच्या अखत्यारीत या मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार होऊन त्या मान्य करून जनतेला दिलासा द्यावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for action against the concerned police officers in the case of beating of MCP activists