जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार 

अभय जोशी 
Saturday, 28 November 2020

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्‍लेशदायक असून, सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्‍लेशदायक असून, सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले, की भारतनानांचं नेतृत्व हे पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरूप झालेलं होतं. मतदारसंघातल्या गावागावांत, घराघरांत त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर - मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह त्या भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलं. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारं त्यांचं नेतृत्वं होतं. भारतनाना भालके यांचं अचानक निघून जाणं ही पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी कॉंग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar paid tributes to MLA Bharat Bhalke