"उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 14 कोटींचा निधी' 

दत्तात्रय खंडागळे 
Wednesday, 27 January 2021

ऑक्‍टोबर 2020 या महिन्यामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांना महापूर आला होता. सांगोला तालुक्‍यातही नद्यांना महापूर येऊन या पुरामध्ये तालुक्‍यातील नदीकाठच्या परिसराचे व बंधाऱ्याचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला व सावे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या नदी तीरावरील भराव वाहून गेला व बंधाऱ्याच्या बांधकामास नुकसान पोचले. खवासपूर, लोटेवाडी, नाझरे, अनकढाळ, कमलापूर, वासूद, बामणी, वाढेगाव, मांजरी व मेथवडे येथील बंधऱ्यांचे नुकसान झाले होते. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला व पंढरपूर तालुक्‍यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 14 कोटींचा निधी त्वरित मंजूर केला. यासाठीची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे आदेश पुणे येथे सोमवारी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली. 

ऑक्‍टोबर 2020 या महिन्यामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांना महापूर आला होता. सांगोला तालुक्‍यातही नद्यांना महापूर येऊन या पुरामध्ये तालुक्‍यातील नदीकाठच्या परिसराचे व बंधाऱ्याचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये बलवडी, चिणके, वाटंबरे, सांगोला व सावे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या नदी तीरावरील भराव वाहून गेला व बंधाऱ्याच्या बांधकामास नुकसान पोचले. खवासपूर, लोटेवाडी, नाझरे, अनकढाळ, कमलापूर, वासूद, बामणी, वाढेगाव, मांजरी व मेथवडे येथील बंधऱ्यांचे नुकसान झाले होते. 

यावर्षी या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा करणे अशक्‍य असल्याने आमदार शहाजी पाटील यांनी कामे त्वरित करण्यासाठी अधिकाऱ्यांना तगादा लावला होता. परंतु ही कामे निविदा न काढता यांत्रिकी विभागाकडून करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे या बंधारे दुरुस्तीसाठी जास्त कालावधी लागणार होता. ही कामे निविदा काढून तातडीने करण्यात यावीत, अशी सततची आमदार शहाजी पाटील यांची मागणी होती. 

23 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. या मागणीची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीमधूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक मुंडे यांना संपर्क केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुणे येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये आमदार शहाजी पाटील यांनी केलेल्या मागणीला अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवत सांगोला व पंढरपूर तालुक्‍यातील बंधारे दुरुस्तीसाठी 14 कोटींचा निधी त्वरित मंजूर केला. निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM approves funds for repair of dams damaged by heavy rains