अल्पशिक्षित असूनही कुटुंबाला दिली उभारी; पंढरपूर शहरातील निशा धुमाळ यांची उद्योगात भरारी 

Despite being poorly educated Nisha Dhumal of Pandharpur city gave a boost to her family
Despite being poorly educated Nisha Dhumal of Pandharpur city gave a boost to her family

पंढरपूर (सोलापूर) : शिक्षण अवघे सहावीपर्यंत, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले, त्यानंतर लग्नही झाले, काही समजण्या आधीच कुुटुंबाची जबाबदारी, आशा कठीण प्रसंगीही न खचता, न डगमगता, पतीच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाला मदत केली. नाविण्याचा ध्यास आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंब तर सावरलेच शिवाय दोन मुलींना उच्चशिक्षण ही दिले. बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. स्वकर्तृत्वावर नव उद्योजिका अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या निशा धुमाळ असे त्यांचे नाव. 

निशा धुमाळ यांचे 1999 साली पंढरपूर शहरातील शशिकांत धुमाळ यांच्याशी विवाह झाला. श्री. धुमाळ हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. राहायला स्वतःते घर नसल्याने ते भाड्याचा घरात राहात होते. अशा अनेक अडचणी आणि संकट प्रसंगी त्यांनी जिद्द, चिकाटी आणि इच्छशक्तीच्या जोरावर कुटुंबाची आर्थिक स्थिती पालटून दाखवली आहे. 

सुरवातीला निशा यांनी स्वयंरोजगार सुरु करण्याचा विचार केला. परंतु मार्ग सापडत नव्हता. नोकरी करावी तर फारसे शिक्षण नव्हते. केवळ घर काम करणं ऐवढच त्यांच्या हाती होतं. दरम्यान अंगभूत असलेल्या पाक कलेचा त्यांना या व्यवसायामध्ये चांगला उपयोग करता आला. उद्योग व्यवसाय सुरु करताना त्यांनी शिक्षणाचा कुठेही न्यूनगंड मनात न बाळगता, आपणही काही तरी करु शकतो, असा आशावाद ठेवला. 2015 साली शहरातील महिलांना एकत्रिक करत त्यांनी यशस्वीनी महिला गृह उद्योगाची सुरवात केली. 
गृह उद्योगाच्या माध्यमातून शेंगालाडू, डिंक लाडू, शेंगपोळी, पालक भाकरी, ज्वारी आणि बाजरीची कडक भाकरी, सर्व प्रकारच्या चटण्या. कोल्हापूरी मसाले तयार करण्याचे काम सुरु केले. गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी 200 हून अधिक महिलांना खाद्या पदार्थ तयार करण्याचे आणि त्याची विक्री करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. 

महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु केलेल्या विविध खाद्या पदार्थ विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक महिलांना स्वयंरोजार मिळाल आहे. या दरम्यान त्यांनी आपल्या दोन मुलींना उच्चशिक्षण दिले. तर पतीचा रिक्षा व्यवसाय बंद करुन त्यांनाही इतर व्यवसायासाठी प्रोत्साहान दिले. व्यवसायामध्ये शिक्षणाची आणि इंग्रजीची अडचण येवू नये यासाठी त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्याचा वर्ग सुरु केला आहे. जेमतेम सहावी शिक्षण झालेल्या निशाताई आता अनेक महिलांना स्वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन ही करतात. 

लॉकडाउन काळात ही त्यांनी आपला स्वयंरोजार नेटाने सुरु ठेवला. या दरम्यान व्यवसायामध्ये थोडेफार नुकसान झाले असले तरी पुन्हा नव्याने उभारी घेत विविध खाद्य पदार्थांचे उत्पादन सुरु केले आहे. आता हळूहळू मागणी वाढू लागली आहे. बिकट झालेली आर्थिक घडी पुन्हा नीट बसवण्याची त्यांची धडपड सुरु आहे. निशा धुमाळ यांना मंगळवेढा येथील सूवर्ण क्रांती महिला उद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्षा कविता खडतरे यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. 

व्यवसायातील त्यांची धडपड आणि प्रामाणिकपणा ओळखून बॅंक ऑफ बडोदा या बॅंकेने त्यांना सेवा केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली आहे. अवघ्या काही दिवसात निशा धुमाळ यांनी बॅंकेचे चांगले काम करुन दाखवले आहे. त्यानंतर त्यांच्या बचत गटाला बॅंकेने सुमारे तीन कोटी कर्जाच्या वसुलीचे काम दिले आहे. त्यातूनही त्यांना व त्यांच्या गटाली महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे. 

निशा धुमार यांनी सांगितले, की महिला बचत गटाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ तयार करुन विक्री करण्याचे काम सुरु केले. यातून चांगला फायदा झाला. माझे कुटुंब मला सावरता आलेच शिवाय इतर महिलांच्या कुटुंबाला देखील हातभार लावता आला. व्यवसाय करताना कुठेही शिक्षण कमी असल्याची मला जाणीव झाली नाही. जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे सर्व अडचणींवर मात करता आली. बचत गटाच्या विविध खाद्य पदार्थांना मागणी वाढली आहे. स्वयंरोगारामुळेच मला माझा दोन्ही मुलींनी उच्चशिक्षण देता आले. स्वतःचे घर घेता आले. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com