धैर्यशील मोहिते-पाटील म्हणतात, "कृष्णा-भीमा'च्या नावाखाली "याचे' सुरू आहे स्थिरीकरण

Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil

अकलूज (सोलापूर) : कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली फक्त नीरा-भीमा स्थिरीकरणाचे काम चालू असून, सरकार पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल करीत आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी मोठे जनआंदोलन उभा करू व प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

श्री. मोहिते-पाटील म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा पश्‍चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील 31 तालुक्‍यांना लाभ होणार असून, हा प्रकल्प 115 टीएमसी पाण्याचा आहे. कृष्णा खोऱ्यातील नद्यांना येणाऱ्या पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी व कायम टंचाईग्रस्त असणाऱ्या भीमा खोऱ्यात आणण्यासाठीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता दिली. परंतु त्यानंतर सत्तेत असलेल्या सरकारमधील याच लोकांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. तरीही सहा जिल्ह्यांतील नागरिकांचे हित लक्षात घेत विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपला पाठपुरावा चालूच ठेवला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लाखो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यांना योजनेचे महत्त्व समजले. परंतु त्यांच्यावरही दबाव आणला गेला. 

त्यानंतर भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यांनी योजनेचे महत्त्व जाणून जागतिक बॅंक व तज्ज्ञांना अभ्यास करण्यास सांगितले व त्यानंतर त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे सहा टप्पे असून त्यातील पहिल्या चार टप्प्यांचे काम सुरू केलेच नाही तर आता जे काम जलद गतीने चालू आहे ते नीरा नदीतील सात टीएमसी पाण्यापुरते असून, हे पाणी मराठवाड्यापर्यंत पोचणारच नाही. कारण, पुढच्या योजनेचे काम संथगतीने चालू आहे, असे मोहिते-पाटील म्हणाले. 

या 31 तालुक्‍यांना होणार लाभ 
कृष्णा-भीमा योजनेत सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, सातारा जिल्ह्यातील फलटण, मान, खटाव, कोरेगाव, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब, तुळजापूर, बीड जिल्ह्यातील आष्टी, अंबेजोगाई या 31 तालुक्‍यांना लाभ होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com