"उत्तर' ग्रामपंचायतीच्या मैदानात उतरले बाजार समितीचे संचालक ! माने-साठे गटात रंगणार सामना

संतोष सिरसट 
Tuesday, 12 January 2021

क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय लहान असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्‍यात अनेक मोठमोठी राजकीय नेतेमंडळी आहेत. त्यामुळे लहान असूनही हा तालुका नेहमीच चर्चेत असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या वडाळा गावाचीही निवडणूक होत आहे. 

उत्तर सोलापूर (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी पडसाळी आणि पाथरी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 22 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. नान्नज, कोंडी, कळमण, तिऱ्हे या गावांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजार समितीचे संचालकही मैदानात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय लहान असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्‍यात अनेक मोठमोठी राजकीय नेतेमंडळी आहेत. त्यामुळे लहान असूनही हा तालुका नेहमीच चर्चेत असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या वडाळा गावाचीही निवडणूक होत आहे. सुरवातीला बिनविरोधाचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी झाले नसल्याने या गावात निवडणूक लागली आहे. या ठिकाणी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या गावामध्ये (कै.) बाबासाहेब अवताडे यांच्या गटाने साठे गटाविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. जितेंद्र साठे यांच्या विरोधात सुदर्शन अवताडे यांनी आपली उमेदवारी दिली आहे. नेहमीच साठे यांच्या पाठीशी वडाळा ग्रामस्थ राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत यात काही फरक होतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

तालुक्‍यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नान्नजकडे पाहिले जाते. या ग्रामपंचायतीवर माजी आमदार दिलीप माने यांच्या गटाची सत्ता आहे. ती सत्ता अबाधित ठेवण्यात त्यांना यश येते का, हे पाहावे लागेल. या ठिकाणीही बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र येऊन माने गटाविरुद्ध निवडणूक लढवीत आहेत. बाजार समितीचे संचालक असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय होणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. चोरेकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत; मात्र स्थानिक पातळीवर त्यांनी माजी आमदार माने यांच्या गटाशी घरोबा केला आहे. 

कळमण ग्रामपंचायतीवर माजी आमदार माने यांच्या गटाची सत्ता आहे. या ठिकाणीही सुरवातीला बिनविरोधचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. स्थानिक पातळीवर लंबे विरुद्ध पवार - पाटील अशी लढत या गावामध्ये होते. पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र शीलवंत यांनी माजी आमदार माने गटाच्या सुनील पाटील यांच्याशी युती करून आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांविरुद्ध दंड थोपटले आहेत. लंबे गटाने केवळ आठ उमेदवार निवडणुकीत उतरविले आहेत. उर्वरित तीन उमेदवारांसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. त्यामुळे या ठिकाणची लढत चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा सामना त्या ठिकाणी होत आहे. 

तिऱ्हे ग्रामपंचायतीत माजी आमदार माने यांच्या गटाची सत्ता आहे. या ठिकाणची सत्ता टिकवण्यासाठी माजी आमदार माने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी मोहिते-पाटील समर्थक भारत जाधव विरुद्ध माने गट असा सामना होत आहे. सख्ख्या जाऊ-जाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आपली सत्ता अबाधित राखण्यात माने गट यशस्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोंडी या सोलापूर शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये लढत होत आहे. विक्रांत काकडे व शिवाजी नीळ हे दोन गट परस्पर विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या काकडे गटाची सत्ता ग्रामपंचायतीवर आहे. बिनविरोधचे प्रयत्न फसल्यानंतर दोन्ही गटांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

तालुक्‍याच्या टोकाला असलेल्या भागाईवाडी ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी, साखरेवाडी ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी, राळेरास ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी, हिरज ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी चुरशीच्या निवडणुका होत आहेत. सोलापूर शहराच्या लगत असलेल्या तळे हिप्परगा ग्रामपंचायतीसाठीही स्थानिक आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. बेलाटी, तेलगाव, भोगाव, बाणेगाव, एकरुख-तरटगाव, खेड, गुळवंची या गावांमधील लढती ही लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे. 

ठळक... 

  • तरुण विरुद्ध ज्येष्ठांमध्ये लढाई 
  • काही गावांमध्ये नात्या-नात्यात लढती 
  • आमदार यशवंत माने यांचा नान्नज, वडाळ्यात प्रचार 
  • हटवादी भूमिकेमुळे अनेक ठिकाणी निवडणुका 
  • पडसाळी, पाथरी या दोनच ग्रामपंचायती बिनविरोध 

माने-साठे गटातच लढती 
उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या स्थानिक राजकारणामध्ये माने विरुद्ध साठे गट असाच सामना प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो. मात्र, यंदाच्या वर्षी काही ठिकाणी माने-साठे गट एकत्र आल्याचेही पाहायला मिळते. त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादी हे पक्षही काही ठिकाणी एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत. पक्षीय पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढल्या जात नसल्या तरी स्थानिक पातळीवरील हेवेदावे, स्थानिक विरोध यानेच निवडणुका चुरशीने होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director of Bazar Samiti contested in North Solapur Gram Panchayat elections