esakal | "भोसे पाणीपुरवठा'साठी पंचायत समिती बैठकीत खडाजंगी ! उपसभापती ढोणेंच्या अध्यक्षतेखाली सरपंचांनी मांडली सभागृहात ठाण 

बोलून बातमी शोधा

Bhose Water}

बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शिखर समिती स्थापन करण्यावरून पंचायत समितीच्या सभागृहातील मासिक बैठकीमध्ये माजी सभापती प्रदीप खांडेकर व पक्षनेते नितीन पाटील यांच्यात खडाजंगी झाली. 

"भोसे पाणीपुरवठा'साठी पंचायत समिती बैठकीत खडाजंगी ! उपसभापती ढोणेंच्या अध्यक्षतेखाली सरपंचांनी मांडली सभागृहात ठाण 
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शिखर समिती स्थापन करण्यावरून पंचायत समितीच्या सभागृहातील मासिक बैठकीमध्ये माजी सभापती प्रदीप खांडेकर व पक्षनेते नितीन पाटील यांच्यात खडाजंगी झाली. शिखर बैठक रद्द करण्यात आली. परंतु काही वेळानंतर उपसभापती सुरेश ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यासाठी सरपंच सभागृहात ठाण मांडून आहेत. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेली ही योजना आठ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. तरीही गेल्या आठ महिन्यांपासून ही योजना बंद होती. योजना सुरू करण्याची जिल्हा परिषदेत नुकतीच 17 लाख रुपये निधीची तरतूद करून 11 फेब्रुवारी हा दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला. शिखर समिती स्थापन करण्यासाठी देखील या वेळी पूर्वी तीन बैठका रद्द करण्यात आल्या. 

आज पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये ही योजना अर्धवट असून, काही गावांना पाणी मिळत नसल्यामुळे तीन महिने योजना जिल्हा परिषदेने चालवावी मग हस्तांतरित करावी व शिखर समिती करावी, असा आग्रह माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी धरला. तर पक्षनेते नितीन पाटील यांनी ही योजना अर्धवट असून पाणी मिळत नसल्याची तक्रार संबंधित गावांच्या सरपंचांनी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत, शिखर समिती स्थापन करण्यासाठी 40 गावांतील सरपंचांना बैठकीला कशासाठी आमंत्रित केले? यावरून खडाजंगी झाली. 

यात काही गावचे सरपंचही बैठकीत घुसले. शेवटी शिखर समितीची बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर उपसभापती सुरेश ढोणे यांनी पाणीपुरवठा खात्याचे उपअभियंता राजकुमार पांडव यांना सरपंचांना मीटिंगचा अजेंडा माझ्या सहीनिशी दिला आणि मीटिंग रद्द करायचा निर्णय परस्पर का घेतला, असा सवाल करून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला. ही बैठक माझ्याच अध्यक्षेतेखाली घ्या, असा आग्रह धरला; अन्यथा सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही, अशी इशाराही दिला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल