ना मिरवणूक, ना ढोल, ना लेझीम... गणरायाच्या स्वागताची मंडळांना लागली हुरहूर

Dhol
Dhol

सोलापर : कोरोनाने गेल्या सहा महिन्यांपासून हाहाकार माजवला आहे. त्यातला त्यात गणेशोत्सव येईपर्यंत सर्व काही ठीक होईल, असे सुरवातीस वाटत असताना, कोरोनाने गणेशोत्सवावरही विघ्न आणले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुकीविना, ढोल-ताशे, लेझीमविना गणरायाचे स्वागत करायचे कसे, अशी हुरहूर समस्त गणेश मंडळांना लागली आहे. 

सर्व जगात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणू मार्चमध्ये भारतात दाखल झाला अन्‌ सर्व उत्सवांवर पाणी फेरले. एक-दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग टळेल, सर्व काही ठीक होईल अशी शक्‍यता धरून घरात बसूनच सण साजरे करावे लागले. मात्र सहा महिने होत आले तरी कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावरही त्याचा परिणाम जाणवत असून, प्रशासनाने मिरवणुकांवर बंदी घातल्याने अनेक मंडळांचा लेझीम, ढोल-ताशांचा सराव बंद आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंडळांनी प्रशासनाच्या नियमांच्या अधिन राहून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

श्री सूर्योदय सांस्कृतिक गणेशोत्सव तरुण मंडळाचे सदस्य महेश बुधारम म्हणाले, गणेशोत्सव येईपर्यंत कोरोना संपूर्ण नायनाट होऊन सर्व काही ठीक होईल असे सुरवातीस आम्हाला वाटत होते. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अगदी उत्सवसुद्धा कोरोनाशी लढत साजरा करायचा आहे. आम्हा वाद्यप्रेमींच्या नेहमीप्रमाणे होणाऱ्या ढोल-ताशांच्या सरावांवरसुद्धा झळ पोचली आहे. यासाठी दरवर्षी प्रचंड पूर्वतयारी करत असत. ढोल व ताशांची पाने, नवीन ढोल व ताशा, ताशांचे स्टिकर्स, टोल, ध्वज असे एकंदरीत 40 ढोल, 15 ताशे, पाच ध्वज व गणवेश यांची तयारी करावी लागत असे. पथकातील एकूण सदस्य 100 खास करून आमच्या 20 भगिनीसुद्धा सहभाग नोंदवत असत. मग आम्ही पूर्वविभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत. इतकेच नाही तर नवरात्रीसाठी हैदराबाद, गुलबर्गा, विजयपूर, लातूर आदी शहरांमध्ये ढोल वाजवायला जात व पारंपरिक वाद्यांचा प्रचार व प्रसार करत. प्रेक्षकांकडून मिळणारा दाद आम्हाला खूप भावून सोडत असे. वादकांमधील रेलचेल, शिस्तबद्धता, उत्स्फूर्तता, वैविध्यता, नावीन्यपूर्णता, समयसूचकता, गांभीर्यता आदी अनुभवास मिळे. मात्र या वर्षी सर्व उत्सवावर व उत्साहावर विरजण पडले आहे. 

जुळे सोलापूर येथील शारदा महिला गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षा अनिता कुलकर्णी म्हणाल्या, आम्हा महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या मंडळात दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो. महिलांना मोकळेपणाने लेझीम खेळता यावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आमचे एक लेझीम पथकही आहे. नऊवारी साडी, फेटे अशा पारंपरिक वेशभूषेतील 150 महिलांचे लेझीम पथक ढोल-ताशाच्या तालावर सराव करत असे. मात्र कोरोनामुळे सर्व उत्साहावर पाणी फेरले गेले. या वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत. 

पाणी वेस तालीम गणेशोत्सव मंडळाचे सचिव श्रीकांत कणबसकर म्हणाले, आमच्या मंडळाची स्थापना 1916 मध्ये झाली. यंदाचे 105 वे वर्ष आहे. इतक्‍या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विना मिरवणूक गणेशोत्सव साजरा करावा लागत आहे. आमच्या लेझीम पथकात 1800 ते दोन हजार कार्यकर्ते सहभागी असतात. 15 दिवस अगोदरपासून सराव सुरू असतो. मात्र यंदा कोरोनामुळे प्रशासनाच्या नियमानुसार साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com