
पुरस्कारप्राप्त 'या' खेळाडूंचा होणार सन्मान
सोलापूर : महाराष्ट्र शासनाने जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून त्यात गुणवंत खेळाडू पुरुष, महिला गुणवंत क्रीडा मार्गदर्शकाचा समावेश आहे. त्यांच्या योगदानाचे मूल्यमान करुन त्यांचा गौरव व्हावा, या हेतूने जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण उद्या (26 जानेवारी) पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांची उपस्थिती असणार आहे.
पुरस्कारप्राप्त 'या' खेळाडूंचा होणार सन्मान
यावर्षी संगमेश्वर महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक संतोष खेंडे यांची गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. 2010 ते 2020 या काळात त्यांना 27 राज्य व 13 राष्ट्रीय पातळीवरील पदके मिळाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले आहेत. दुसरीकडे गुणवंत खेळाडू म्हणून ओम आवस्थी याची निवड करण्यात आली आहे. त्याने 2017-18 मध्ये पुण्यातील कनिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत हायबोर्ड या प्रकारात रौप्यपदक मिळविले आहे. तीन मिटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेतही रौप्यपदक मिळविले आहे. तसेच भोपाळ येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभाग नोंदविला असून या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले. ईशा वाघमोडे हिने कनिष्ठ जलतरण स्पर्धेत रौप्यपदक मिळवले असून राजकोट येथील तीन मिटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. साधना भोसले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉल या क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला. भारतीय संघातही निवड झाली. नोव्हेंबर 2029 मधील पांडस हेरिटेज स्टेडिअम झोंग्सन चायना येथील आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल एशियन क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश झाला आहे. या सर्व खेळाडूंचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केला जाणार आहे, असे जिल्हा क्रीडाधिकारी तारळकर यांनी सांगितले.