"दैव देते, केंद्र सरकार नेते' : कांदा निर्यातबंदीचा जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निषेध 

हुकूम मुलाणी 
Saturday, 19 September 2020

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा महिलाध्यक्षा अनिता नागणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट या ठिकाणी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबद्दल आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

मंगळवेढा (सोलापूर) : शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सदकारची भूख, दैव देते केंद्र सरकार नेते, शेतकरी टिकेल तर शेती पिकेल... अशा घोषणा देत, केंद्र सरकारने कांद्यावर घातलेल्या निर्यातबंदी धोरणाचा सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. 

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा महिलाध्यक्षा अनिता नागणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट या ठिकाणी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबद्दल आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले, की सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लावलेला आहे. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला की लगेच केंद्रातील भाजप सरकारने बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे केंद्र सरकार नाही, असे यातून स्पष्ट होते. या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने देशोधडीला लावले आहे. दुष्काळ, गारपीट, टंचाई, रोगराई अशा कित्येक नैसर्गिक आव्हानांचा सामना करत असताना शेतकऱ्याने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेले पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहे. 

महाराष्ट्रातील शेतकरी टिकला तर शेती पिकेल. कोरोनाच्या या संकट काळात डॉक्‍टर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत देशातील सर्व भुकेल्या जनतेसाठी शेतकरी शेतात राबत आहे. जनतेला अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी अहोरात्र ऊन-पावसाचा सामना पिकावरील रोगराईसह उत्पादन व दरासाठी संघर्ष करत शेतात अन्नधान्य पिकवत आहे. परंतु या कष्टकरी शेतकऱ्याच्या कष्टाचा मात्र केंद्र सरकारला विसर पडला आहे. केलेली निर्यातबंदी तातडीने रद्द करून 
महाराष्ट्रासह देशातील शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, असे निवेदनात नमूद केले. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, तालुकाध्यक्षा संगीता कट्टे, शहराध्यक्षा प्रफुल्लता स्वामी, मंदाकिनी सावंजी, सारिका सलगर, अश्विनी कांबळे, लता माने, स्मिता अवघडे, सुनीता मेटकरी यांनी तहसीलदार रावडे यांना तीन संघटनांची तीन वेगवेगळी निवेदने देऊन कांदा निर्यातबंदीस विरोध दर्शवला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Womens Nationalist Congress protests against onion export ban policy