#Solapur : 'आवाज वाढव डीजे.. आपल्याला पोलिसांची भीती नाही..!'

#Solapur : 'आवाज वाढव डीजे.. आपल्याला पोलिसांची भीती नाही..!'

सोलापूर : सोलापुरात जयंती, उत्सवांवेळी पोलिसांसमोरच डीजे लावून, फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी करून ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केले जाते. याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार केली तरी पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कायदा असूनही पोलिसांकडून डीजे चालक, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. 

उल्लंघन होऊनही पोलिसांकडून काणाडोळा
राष्ट्रपुरुषांच्या जयंतीसह विविध उत्सव, कार्यक्रमांच्या निमित्ताने डीजे लावण्याची परंपरा सोलापुरात आधीपासूनच आहे. मध्यंतरी तत्कालीन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, महादेव तांबडे यांच्या कार्यकाळात डीजेवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. अलीकडे मात्र ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होऊनही पोलिसांकडून काणाडोळा केला जात आहे. कर्णकर्कश डीजेसह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजीही केली जात आहे. पोलिसांच्या समोरच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. 

फटाके उडवल्यामुळे अपघाताची शक्‍यता
सोलापुरात महिन्यातून किमान दोन ते तीन मोठे जयंती उत्सव साजरे होतात. मिरवणुका, डीजे आणि फटाक्‍यांची आतषबाजी हे ठरलेलेच आहे. डीजेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. डीजेसोबतच सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवल्यामुळे अपघाताची शक्‍यता असते. अनेकदा रस्त्यावर लावण्यात येणारे फटाके उडून गर्दीमध्ये किंवा लोकांच्या अंगावर पडल्याचे दिसून येते. बुधवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी डीजे लावला होता. 

मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनिप्रदूषण
स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात विविध विकासकामे होत असली तरी लोकांच्या मानसिकतेत अपेक्षित बदल होत नसल्याचे दिसत आहे. कोणताही सण, उत्सव असो सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनिप्रदूषण केले जात आहे. 

पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.. 
शिवजयंती मिरवणुकीत डीजे लावल्याप्रकरणी काही मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली, मात्र गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून खड्डा तालीम मंडळाच्या मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवल्याप्रकरणी गणेश राजू भोसले (रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्यावर तसेच शिवराम प्रतिष्ठान मंडळाचा अध्यक्ष अक्षय मच्छिंद्र शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी शिवाजी चौकात आयोजित पाळणा कार्यक्रमावेळी फटाके उडवल्याप्रकरणी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शिवजयंती मिरवणुकीत फटाक्‍यांची आतषबाजी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली आहे. मिरवणुकीत लावलेल्या डीजेच्या आवाजाची मोजणी करून त्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 

-- 
राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये डीजे लावायला बंदी करायला हवी. शिवजयंतीच्या मिरवणुकीत अनेक मंडळांमध्ये आवाजाची स्पर्धा चालू होती. मोठ्या आवाजातील डीजेमुळे लोकांना त्रास होतो. विशेषत: रुग्णांना डीजेचा आवाज असह्य होतो. मुक्‍या प्राण्यांचा तर कोणीच विचार करत नाही. पोलिसांनी डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. 
- विश्‍वजित दराडे, 
सामाजिक कार्यकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com