ज्ञानोबा- तुकोबांच्या पादुका एकत्रित आल्यास वारकऱ्यांचा आनंद होणार द्विगुणित

Dnyanoba and Tukoba will be happy if they come together
Dnyanoba and Tukoba will be happy if they come together

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्‍वर आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्या स्वतंत्ररीत्या पंढरपूरकडे येत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ज्ञानोबा, तुकोबा, सोपानकाका आणि संत चांगावटेश्‍वर यांच्या पादुका हेलिकॉप्टर, विमान अथवा बसमधून एकत्रित आणण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रित पंढरपूरला याव्यात ही अनेक वारकऱ्यांच्या मनातील अनेक वर्षांपासून असलेली इच्छा यानिमित्ताने पूर्णत्वास जाणार आहे. 
ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रित आल्यास लाखो वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. कोरोनाच्या संकटकाळात घडलेली ही अत्यंत आनंददायी गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे वारकरी शासनाला निश्‍चितच धन्यवाद देतील, अशा भावना वारकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. 
आळंदीतून संत ज्ञानेश्‍वर, देहूतून संत तुकाराम, त्रंबकेश्‍वरवरून संत निवृत्तीनाथ, सासवडवरून संत सोपानकाका, पैठणमधून संत एकनाथ, मुक्ताईनगरमधून संत मुक्ताबाई तसेच सासवड येथील श्री चांगावटेश्‍वर देवस्थान आणि कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थानच्या पादुका दशमीदिवशी पंढरपूरात आणण्यात येणार आहेत. यापैकी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत सोपानकाका आणि संत श्री चांगावटेश्‍वर यांच्या पादुका एकाच हेलिकॉप्टरमधून आणण्याचा विचार सुरू आहे. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हेलिकॉप्टर उडण्यास अडचण नसेल तर प्राधान्याने हेलिकॉप्टरमधून पादुका पंढरपूरला आणण्याचा विचार सुरू आहे. हवामानामुळे हेलिकॉप्टर उडाणास अडचण आल्यास विमान अथवा एसटी बसमधून पादुका पंढरपूरला आणण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्याविषयीची माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे लगेचच पादुकांच्या प्रवासाविषयीचे नियोजन सुरू झाले आहे. 

ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया 
नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार 
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत 
तुका जालासे कळस । भजन करा सावकाश
 
आषाढी एकादशी व त्यानिमित्त होणारा पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगण येथून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने एक आनंद सोहळाच असतो. 
यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे वारीनिमित्त होणारा पालखी सोहळा नाईलाजाने थोडासा बदलत्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयीचा निर्णय काल जाहीर केला आहे. या निर्णयाला सर्व वारकरी संप्रदायांनी मनापासून पाठिंबा दिला आहे. पालखीसोबत चालत विठ्ठल नामाचा गजर करत येताना जे अलौकिक समाधान मिळते ते यावर्षी मिळणार नसल्याने सर्वसामान्य वारकरी मनोमन थोडासा खट्टू आहे; परंतु यावर्षी संत ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला व संत तुकारामांनी कळस रचत जी अद्‌भुत इमारत फळाला नेली आहे ती एकसंध इमारत साकार होताना पाहण्याचे भाग्य एकप्रकारे यावर्षी आपल्या सर्वांना मिळणार आहे. 
"संतकृपा जाली । इमारत फळा आली' असे बहिणाबाई का म्हणाल्या होत्या ते यावर्षी आपल्या सर्वांना दृश्‍य स्वरूपात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पायी सोहळा होणार नसला तरी ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रित पंढरपूरला याव्यात ही अनेक वारकऱ्यांच्या मनातील अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्णत्वास जाणार आहे. त्यादृष्टीने यंदाच्या वारीचा हा सोहळा निश्‍चितच ऐतिहासिक ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com