कोरोनासोबत एकटा नव्हे तर कुटुंबीयांसह लढतोय डॉक्‍टर! 

श्रीनिवास दुध्याल 
मंगळवार, 30 जून 2020

आपल्या घरातील कोरोनाबाधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी दबाव आणणारे दिसून आले. परंतु, हेच लोक आपल्या शेजारच्या डॉक्‍टरला किंवा परिचारिकेला, "तुम्ही जर हॉस्पिटलला जाणार असाल तर परत घराकडे यायचे नाही, आमच्या गल्लीत यायचे नाही,' अशा धमक्‍या देत डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकतानाही पाहिले आहे.

सोलापूर : आजही आपण ऐकतोय, की कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणारा डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह आला व त्याचे कुटुंबीयही बाधित झाले. काहींचे मृत्यूही झाले. डॉक्‍टरच्या घरातील वयस्क आई, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशाही घटना घडत आहेत. अनेकांनी अशी टीकाही केली, की "कोरोनाला डॉक्‍टर एवढं का घाबरताहेत? सैनिक युद्धाच्या वेळी पळून जातात का?' मात्र सीमेवर सैनिक एकटा शत्रूशी लढत असतो. कुटुंबीय त्याच्यापासून दूर असतात. मात्र, कोरोनासोबत जो डॉक्‍टर लढत आहे, तो त्याच्या कुटुंबीयांसह. आपल्या घरातील परिस्थिती पाहून काही डॉक्‍टरांनी काही दिवस क्‍लिनिक बंद ठेवले, तर त्यात वावगं काही नाही, अशा प्रतिक्रिया "डॉक्‍टर्स डे'निमित्त डॉक्‍टरांनी "सकाळ'शी बोलताना दिल्या. 

हेही वाचा : लॉकडाउननंतर प्रथमच "या' उद्योगाला दिसला आशेचा किरण! 

या काळात आपल्या घरातील कोरोनाबाधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी दबाव आणणारे दिसून आले. परंतु, हेच लोक आपल्या शेजारच्या डॉक्‍टरला किंवा परिचारिकेला, "तुम्ही जर हॉस्पिटलला जाणार असाल तर परत घराकडे यायचे नाही, आमच्या गल्लीत यायचे नाही,' अशा धमक्‍या देत डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकतानाही पाहिले आहे. तसेच कोरोना झाल्यास आपल्यावर समाज बहिष्कार घालेल, या भीतीमुळे अनेकजण कोरोनाची लक्षणे लपवत आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात गंभीर अवस्थेत हे रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत आहेत; त्यामुळे आज सोलापूरचा मृत्यूदर 10 टक्केच्या आसपास पोचलेला आहे, जो देशातील मृत्युदरापेक्षाही तीन पटीने जास्त आहे. 

सुरवातीला खूप गोंधळाची परिस्थिती होती. कंटेन्मेंट झोनमध्ये क्‍लिनिक चालू ठेवायचे की नाही, क्‍लिनिकची जागा जर छोटी असेल तर तेथे सहा फुटांचे सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे, या सगळ्या गोंधळामध्ये बऱ्याच डॉक्‍टरांनी क्‍लिनिक बंद ठेवले. परंतु क्‍लिनिक बंद ठेवलेले डॉक्‍टर्स हे प्रामुख्याने जास्त वयोगटातील होते किंवा त्यांना मधुमेह, किडनीचा त्रास, दमा आहे. तरी 90 टक्के डॉक्‍टरांनी आपल्या क्‍लिनिकमधून रुग्णसेवा दिली आहे. 

हेही वाचा : बापरे..! "यांची' कोट्यवधींची रुपयांची गुंतवणूक संकटात 

सध्याच्या या कोरोना साथीच्या आजारात आपल्यावर ओढवलेल्या भयंकर परिस्थितीत आमचे सारे डॉक्‍टर बंधूभगिनी व पॅरामेडिकल स्टाफ अतिशय संयमाने आणि एकजुटीने आपल्या कामाची धुरा सांभाळत आहोत. यामध्ये काही जणांना तर आपला जीवही गमवावा लागला आहे. यातच आम्हीही वैयक्तिक पातळीवर खारीचा वाटा उचलला आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. निदान यापुढे तरी डॉक्‍टर रूपातील देवदूतांना नेहमीच आदराने वागवा. त्यांच्यावर होणारे अमानवी हल्ले थांबवा. 
- डॉ. कीर्ती कटारे, 
आयुर्वेद डॉक्‍टर 

समाजामध्ये कोरोनाबाबत इतकी भीती आहे, की बरेचसे रुग्ण आजही क्‍लिनिकमध्ये यायला घाबरतात. फोन करून आपल्या आजाराबद्दल सल्ले विचारतात. डॉक्‍टर क्‍लिनिकमध्ये असतात तर रुग्ण नसतात. या कालावधीत भीतीमुळे केवळ 20 ते 30 टक्के रुग्णच क्‍लिनिकला येत आहेत. त्यामुळे हे क्‍लिनिक बंद आहेत, असा दोष देण्याला काही अर्थ नाही. कोरोना झालेल्या रुग्णांना समाजाने मानसिक धैर्य द्यावे. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना पाठिंबा देऊन प्रोत्साहन द्यायला हवे. 
- डॉ. विजय अंधारे, 
हृदयरोग शल्यविशारद 
 
दहा टक्के चुकीचे काम करणाऱ्यांमुळे 90 टक्के चांगलं काम करणाऱ्यांना नावे ठेवू नये. काही दवाखाने बंद असतील, परंतु बहुतांश दवाखाने सुरू होते व आम्ही डॉक्‍टर मागील तीन-चार महिन्यांपासून एकही दिवस सुटी न घेता काम करत आहोत. प्रचंड ताण आहे. मागील तीन महिन्यांपासून घरच्यांसोबत जेवणही करू शकलो नाही. दिवसातून तीनदा केमिकलने अंघोळ करावी लागते. कंटाळा आला तरी सेवा सोडलेली नाही. आम्हाला "डॉक्‍टर्स डे'निमित्त प्रेमाचे, कौतुकाचे दोन शब्द गिफ्ट म्हणून दिले तरी आनंद आहे. 
- डॉ. सचिन कुलकर्णी, 
ऑर्थोपेडिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors is fighting against Corona with his family not alone