लॉकडाउननंतर प्रथमच "या' उद्योगाला दिसला आशेचा किरण! 

श्रीनिवास दुध्याल 
सोमवार, 29 जून 2020

राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान मंजूर केल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कामे मोठ्या प्रमाणात मिळण्याची आशा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण सुरत, मुंबई येथेही युनिफॉर्म उत्पादने होतात; मात्र तेथील कामगारांनी स्थलांतर केल्याने व सोलापुरात स्थानिक कुशल कामगार मुबलक प्रमाणात असल्याने सोलापुरात मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर पूर्ण करण्याची क्षमता आहे. 

सोलापूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्य शासनाने नुकतेच अध्यादेश जारी केले असून, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळणार आहेत. त्यामुळे युनिफॉर्म हब असलेल्या सोलापुरातील गारमेंट उत्पादकांमध्ये आशेचे किरण दिसल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : बापरे..! प्रचंड नुकसानीमुळे होत आहे "या' कंपन्यांमध्ये कामगार कपात 

"सोलापूर युनिफॉर्म हब'च्या दिशेने जाणारा येथील गारमेंट उद्योग लॉकडाउनमुळे पिछाडीवर पडला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मिळवलेली देशांतर्गत व विदेशात मिळवलेली ख्याती या लॉकडाउनमुळे पाण्यात गेल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षांपासून येथील गारमेंट उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून सोलापूरचे नाव युनिफॉर्म हबमध्ये नोंदवले आहे. त्यामुळे देशभरातील विविध राज्यांतील शाळा- महाविद्यालयांसाठी युनिफॉर्मच्या ऑर्डरी नोंदवल्या जातात. मात्र लॉकडाउनमुळे शाळा व महाविद्यालये कधी सुरू होणार, याची काहीच शक्‍यता नसल्याने हाती आलेल्या गणवेशाच्या ऑर्डरी रद्द झाल्या. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत तोपर्यंत युनिफॉर्मची मागणी होणार नाही. त्यामुळे उत्पादकांनी निदान कामगारांना रोजगार मिळावा म्हणून मास्क, हॅंडग्लोव्ह्‌जची निर्मिती सुरू केली आहे. 

हेही वाचा : बापरे..! "यांची' कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक संकटात 

सोलापूरच्या उत्पादकांसाठी जमेची बाजू 
राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अनुदान मंजूर केल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कामे मोठ्या प्रमाणात मिळण्याची आशा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण सुरत, मुंबई येथेही युनिफॉर्म उत्पादने होतात; मात्र तेथील कामगारांनी स्थलांतर केल्याने व सोलापुरात स्थानिक कुशल कामगार मुबलक प्रमाणात असल्याने सोलापुरात मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर पूर्ण करण्याची क्षमता आहे. 

निस्तेज झालेल्या गारमेंट उद्योगास पुन्हा चालना मिळेल 
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केल्याने सोलापूरसारख्या युनिफॉर्म हबला गणवेशाची कामे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. येथे कामगार टिकून आहेत. जर आता कामे मिळाल्यास दिवाळीपर्यंत पूर्ण होऊ शकतील. यामुळे निस्तेज झालेल्या गारमेंट उद्योगास पुन्हा चालना मिळेल. याचप्रमाणे खासगी शाळांच्याही ऑर्डरी मिळाल्यास पूर्ण उद्योग तरून जाईल. 
- राजेंद्र कोचर, 
सचिव, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfaction in the garment industry due to approval of uniform grant for Zilla Parishad school students