अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास प्रशासन करतेय टाळाटाळ ! शेतकरी संतप्त 

Water in field
Water in field

मंगळवेढा (सोलापूर) : गत महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपातील बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देऊनदेखील ग्रामीण भागात पिकांचे पंचनामे केले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून कृषी व महसूल खात्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

यंदाच्या हंगामात पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे तालुक्‍यात शेतकऱ्यांनी खरिपात बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, उडीद, कांदा या पिकांची पेरणी केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सर्वाधिक क्षेत्र तालुक्‍यामध्ये सूर्यफुलाची असताना देखील या पिकाला वगळण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरताना बाजरी, तूर आणि मका व कांदा या पिकांचा आधार घेतला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. सूर्यफुलाच्या नुकसान भरपाईबाबत साशंकता निर्माण झाली. तर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रशासनाने दखल घेणे आवश्‍यक होते. 

दरम्यान, पिकांचे पंचनामे करण्यासाठी आमदार भारत भालके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी 21 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व कृषी व मंडलाधिकाऱ्यांना दिले. परंतु यामध्ये काही गावांत आदेश नसल्याचे सांगत वेळ मारून नेली जात आहे तर नदीकाठच्या गावांत पंचनामे करण्यात आल्याचे वृत्त आहे. परंतु इतर भागात मात्र पंचनामे करण्यात कृषी आणि महसूलच्या गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मात्र त्रस्त झाला आहे. गतवर्षी काही गावांत फळपिकाचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा त्यातून वगळले होते. त्यामुळे त्यांना शासकीय मदत नाही की विमा कंपनीची मदत. अशा परिस्थितीत यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या गाव पातळीवरील कृषी व महसूल कर्मचारी मुख्यालयाऐवजी तालुक्‍यातून कारभार करत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कशा कळणार, असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. 

याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे म्हणाले, पंचनामा करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. ज्या गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत त्यांनी संबंधित तलाठ्यांकडे अर्ज देऊन त्याची पोच घ्यावी. त्यानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार म्हणाले, पाणी लागलेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या संदर्भात निवेदन देऊन देखील कृषी व महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. शेतातील पाणी संपल्यावर नुकसान कसे दिसणार? सद्य:स्थितीला पंचनामे करण्याची आवश्‍यकता आहे. याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे ना विमा कंपनी. त्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. 
श्रीमंत केदार तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. 

आमदार भारत भालके म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासंदर्भात यापूर्वीही सूचना दिल्या होत्या. तरीही पंचनामे केले जात नसतील तर उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगू. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com