esakal | डॉ. भोसले म्हणाले, जिल्हाधिकारी पदाचा मिरविला नाही दिवा 
sakal

बोलून बातमी शोधा

dr. bhosle photo

डॉ. भोसले यांनी सांगितला प्राधान्यक्रम 
सोलापूर कृषिप्रधान जिल्हा असल्याने शेती व शेतकऱ्यांना प्राधान्य दिले. कायद्याचा वापर सकारात्मक केल्यास लोकाभिमुख प्रशासन शक्‍य होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपण कायद्याचा वापर सकारात्मकपणे केला. शासकीय कामासाठी कोणालाही हेलपाटे मारावे लागू नये यासाठी घेतली दक्षता घेतली असल्याची माहितीही डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी दिली. 

डॉ. भोसले म्हणाले, जिल्हाधिकारी पदाचा मिरविला नाही दिवा 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : राजकारण्यांसोबतचे संगनमत कधीही धोक्‍याचेच. राजकारण्यांसोबतच संगनमत नकोय तर त्यांना सहकार्य हवंय. अधिकारी होण्यापूर्वी बघितलेले स्वप्न आणि प्रत्यक्ष काम करतानाची स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. जिल्हाधिकारीपदाचा दिवा मिरविण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्या दृष्टीने काम करण्यावर आपण भर दिला. लोकाभिमुख प्रशासन दिले असल्याची माहिती सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी व पुण्याचे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 
हेही वाचा - जात पडताळणी समितीचा इशारा...मूळ कागदपत्र द्या अन्यथा फौजदारी 
डॉ. भोसले यांचा निरोप समारंभ आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम आज शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झाला. त्यावेळी डॉ. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर, डॉ. भोसले यांचे वडील बबनराव भोसले, डॉ. भोसले यांच्या पत्नी सौ. दीपाली भोसले, आमदार संजयमामा शिंदे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, ऍड. सचिन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. भोसले म्हणाले, प्रशासकीय सेवेत आजपर्यंत माझ्या 19 बदल्या झाल्या आहेत. सोलापूर सोडताना मला जास्त दुख: होत आहे. सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून केलेले काम माझ्यासाठी अभिमानास्पद असेल. सोलापूरकरांनी केलेल्या प्रेमाबद्दल भोसले दांपत्य आज भावुक झाले होते. 
हेही वाचा - धक्कादायक! परीक्षा नियंत्रकपदासाठी 15 पैकी 11 जण अपात्र 
सौ. दीपाली भोसले म्हणाल्या, अधिकाऱ्याची पत्नी असणे याला जेवढे वलय आहे, तेवढाच हा काटेरी मुकुटही आहे. आपल्या पतीचा जास्तीत जास्त वेळ आपल्याला मिळावा ही प्रत्येक पत्नीची इच्छा असते. मी या इच्छेचा त्याग आनंदाने स्वीकारला आहे. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, भोसले यांची व माझी 22 वर्षांपासूनची मैत्री आहे. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी माझी बदली होते. त्यांच्या कामातून निर्माण झालेली उंची टिकवून ठेवण्याचे आवाहन माझ्यासमोर आहे. सोलापूरकरांची अपेक्षापूर्ती माझ्या कामातून होईल. डॉ. भोसले यांच्याप्रमाणे सोलापूरकरांनी मलाही प्रेम व सहकार्य करावे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, डॉ. भोसले यांच्या प्रमाणे सामाजिक बांधिलकी व सकारात्मक दृष्टिकोन असलेले अधिकारी महाराष्ट्रात असल्याने इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. डॉ. भोसले यांनी त्यांच्या सेवेत सामाजिक भान आणि सर्वसामान्य व्यक्ती डोळ्यासमोर ठेवला आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, डॉ. भोसले यांचा सर्वसामान्यांबद्दलचा दृष्टिकोन, त्यांच्याकडे असलेले ज्ञान आणि काम करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. डॉ. भोसले यांची सोलापुरातील कामगिरी कायमस्वरूपी सोलापूरकरांच्या मनात राहील.

go to top