कोरोना लस सुरक्षित ! अफवांवर विश्‍वास ठेवू नका : डॉ. संभाजी राऊत 

प्रदीप बोरावके 
Wednesday, 27 January 2021

डॉ. राऊत म्हणाले, कोरोना लसीबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामध्ये तथ्य काहीच नाही. काही भारतीय युरोपीय देशांमध्ये जाऊन लस घेऊन आले आहेत. भारतात अपेक्षेपेक्षा लवकर लस आली आहे. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनी नंबर आल्यावर तो डावलू नये. लसीकरणासाठी नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करायला हवे.

माळीनगर (सोलापूर) : कोरोनाची लस पूर्णतः सुरक्षित असून नागरिकांनी न घाबरता ती घ्यायला हवी, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संभाजी राऊत यांनी केले आहे. दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरीच्या वतीने येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेच्या मैदानावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संभाजी राऊत बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. या वेळी माळीनगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे, पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे, अध्यक्ष नंदकुमार गिरमे, उपाध्यक्ष परेश राऊत, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अनिल रासकर, उपाध्यक्ष अजय गिरमे, संचालक ऍड. सचिन बधे, कल्पेश पांढरे, डॉ. विद्या एकतपुरे आदी उपस्थित होते. 

डॉ. राऊत पुढे म्हणाले, कोरोना लसीबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामध्ये तथ्य काहीच नाही. काही भारतीय युरोपीय देशांमध्ये जाऊन लस घेऊन आले आहेत. भारतात अपेक्षेपेक्षा लवकर लस आली आहे. लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनी नंबर आल्यावर तो डावलू नये. लसीकरणासाठी नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करायला हवे. 

गीताई प्रतिष्ठानतर्फे डॉ. कमलाकर फरताडे यांना माळीनगर गौरव तर प्रणव बुगड यास बाल गौरव पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आला. माळीनगर महिला मंडळातर्फे अनुष्का चंदनशिवे हिला आदर्श विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले. स्वराज अमित सावंत याने गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यालाही या वेळी सन्मानित करण्यात आले. दि मॉडेल विविधांगी प्रशालेस फिट इंडिया मोहिमेतील सहभागाबद्दल मिळालेले प्रमाणपत्र या वेळी मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आले. संजय बांदल यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. रामहरी वायचळ यांनी सूत्रसंचालन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sambhaji Raut assured that the Indian vaccine on corona is safe