Fastag Update : फास्टॅग नसल्याने वरवडे टोलनाक्यावर दोन हजार वाहनांकडून दुप्पट टोल वसूल

संतोष पाटील
Wednesday, 17 February 2021

वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, म्हणून टोलनाक्यावरील दोन्ही बाजूच्या एका लेनमधून दंड स्वरूपात दुप्पट टोल वसूल करून वाहनांना सोडण्यात आले. 

टेंभुर्णी (सोलापूर) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यातील टोलनाक्यावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आले असून सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी वरवडे येथील टोलनाक्यावर सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत फास्टॅग नसलेल्या 2078 वाहनधारकांकडून दंड स्वरूपात दुप्पट टोल वसूल केला आहे. तसेच 207 वाहनधारकांनी फास्टॅग लावून घेतला आहे, अशी माहिती वरवडे टोलप्लाझाचे व्यवस्थापक गजानन तुपे यांनी दिली. 

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोलनाक्यावर होणारी वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग बंधनकारक केल्याने मध्यरात्री सुरूवातीला टोलप्लाझावर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आल्याचे वाहनधारकांना समजून सांगावे लागत होते. त्यावेळी काही वाहनधारक व टोलप्लाझावरील कर्मचारी यांच्यात किरकोळ शाब्दीक चकमक झाल्याच्या घटना घडल्या.

अनेक वाहनधारकांनी फास्टॅग लावण्यामध्ये अनकुलता दाखविली. टोलनाक्यावर फास्टॅग लावून देण्याची सुविधा उपलब्ध केल्याने रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 207 वाहनधारकांनी वाहनांवर फास्टॅग लावून घेतला. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, म्हणून टोलनाक्यावरील दोन्ही बाजूच्या एका लेनमधून दंड स्वरूपात दुप्पट टोल वसूल करून वाहनांना सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

टोलनाक्यावर गैरप्रकार घडू नये म्हणून चार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत वरवडे टोलनाक्यावरील १४ पैकी १२ फास्टॅग लेनमधून 11 हजार 775 वाहनांची ये- जा झाली आहे. रात्री बारा वाजल्यापासून टोलनाक्यापासून दोन्ही बाजूस पाचशे मीटर अंतरावर मार्शलची नियुक्ती केली असून वाहनांवर फास्टॅग आहे का याची खात्री करून वाहन टोलनाक्यावर सोडण्यात येत आहेत.

ज्या वाहनांवर फास्टॅग नाही, त्या वाहनांवर फास्टॅग लावण्याची तसेच रिचार्ज करण्याची सुविधा टोलप्लाझावर करण्यात आली असून या ठिकाणी फास्टॅग लावून घेण्यासाठी गर्दी झाली होती. सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे. टोलनाक्यावर वाहतूकीची कोंडी होवू नये, म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टोलनाक्यावरील वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात आले असल्याचे व्यवस्थापक गजानन तुपे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of fastag double toll has been collected from two thousand vehicles at Varavade toll plaza