आमदार भारत भालके यांच्या शिष्टाईला यश; काळे-महाडिक यांचे कारखाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा 

भारत नागणे 
Sunday, 11 October 2020

आमदार भालकेंनी केलेल्या या यशस्वी मध्यस्थीमुळे या दोन्ही साखर कारखान्यांना मोठी आर्थिक मदत झाली आहे. शिवाय सरकारच्या हमीमुळे गाळप हंगाम सुरु होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. यापुढच्या काळात काळे-महाडिक कोणती राजकीय भूमिका घेतात याकडेच आता लक्ष लागले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : विठ्ठल परिवाराशी निगडीत असलेले पण भाजपशी सलगी असलेल्या कल्याणराव काळे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या साखर कारखान्यांना राज्य शासनाने मदत करावी यासाठी आमदार भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शिष्टाई केली होती. त्यांची ही शिष्टाई अखेर यशस्वी झाली आहे. काळे- महाडिक यांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने थकहमी मंजूर करुन आमदार भालकेंच्या शब्दाला किंमत दिली आहे. 
मागील वर्षीच्या गाळप हंगामात बंद असलेल्या विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि भीमा या तिन्ही साखर कारखान्यांपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली होती. थकीत एफआरपी आणि विविध बॅंकांच्या कर्जामुळे इतर सर्व मार्ग बंद झाले होते. राज्य शासनाने हमी घेतल्याशिवाय कारखाने सुरु करणे अशक्‍य होते. 
विठ्ठल कारखान्याचे आमदार भारत भालके हे गेल्या चार महिन्यांपासून यासाठी प्रयत्न करत होते. अनेक प्रयत्नानंतर त्यांच्या कारखान्याला हमी देण्याची सरकारने तयारी दर्शवली होती. परंतु विठ्ठल परिवाराशी सलग्न असलेल्या शिरोमणी वसंतराव काळे आणि भीमा या दोन साखर कारखाने सुरु होणार का या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्यातच काळे-महाडिक हे भाजपत असल्यामुळे राजकीय गुंता निर्माण झाला होता. 
साखर कारखाने बंद राहिल्यामुळे उस गाळपाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय शेतकरी आणि कामगारांचे देखील मोठे नुकसान होईल याचा विचार करुन आमदार भारत भालके यांनी काळे आणि महाडिक यांच्या साखर कारखान्यांना मदत करावी लागते, असा शब्द अजित पवारांकडे टाकला होता. त्यानंतर श्री. पवार यांनी बघू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर 9 आक्‍टोंबर रोजी राज्य शासनाने काळे, महाडिक यांच्या कारखान्याला हमी दिली आहे. 
आमदार भालकेंनी केलेल्या या यशस्वी मध्यस्थीमुळे या दोन्ही साखर कारखान्यांना मोठी आर्थिक मदत झाली आहे. शिवाय सरकारच्या हमीमुळे गाळप हंगाम सुरु होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. यापुढच्या काळात काळे-महाडिक कोणती राजकीय भूमिका घेतात याकडेच आता लक्ष लागले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to MLA Bharat Bhalke the state government has given guarantee to Kale Mahadiks sugar factories