वाहव्वा ! सांघिक प्रयत्नांमुळे "या' गावाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे 

Corona Negative
Corona Negative

पानगाव (सोलापूर) : पानगाव (ता. बार्शी) येथे सुमारे 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती पाहता, ती बदलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणा या तिघा विभागांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना ग्रामस्थांनी दिलेली साथ उपयुक्त ठरली. त्यामुळे पानगाव जवळपास कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. गावातील सर्वच बारा रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने गावातील दोन टप्प्यांत पाळलेल्या कडकडीत बंदचा गावाला मोठा फायदा झाला आहे. 

पानगाव परिसरात जून महिन्याच्या मध्यापर्यंत एकही रुग्ण नसल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण होते. परंतु जूनमध्ये गावात एक रुग्ण आढळून आला आणि बघता बघता पुढे ही रुग्णसंख्या एकवरून 12 वर पोचली. परिणामी गावात व परिसरात कोरोनाबद्दल घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या परस्थितीला न डगमगता ही कोरोनाची साखळी कशी तोडता येईल, यावर ग्रामपंचायत प्रशासन, कोरोना ग्राम कृती समिती, बार्शी तालुका पोलिस ठाणे, गावातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विविध व्यवसायातील व्यापारी वर्ग यांनी विचारमंथन करून वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे कोरोनाला हद्दपार करण्याचे ठरवले. 

ठरल्याप्रमाणे दोन टप्प्यांत सुमारे अकरा दिवस गाव बंद ठेवण्यात आले. या बंदला गावातील प्रत्येक नागरिकाचे मोठे सहकार्य लाभले. स्थानिक प्रशासनाच्या निर्णयाचा स्वीकार करत नागरिकांनी त्यांना मोलाची साथ दिली. यादरम्यान गावात आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका यांनी वेळोवेळी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. तर पोलिस प्रशासनाने बंदच्या काळात आपली कामगिरी चोख पार पाडली. या त्रिसूत्रीवर गावाने कोरोनावर नियंत्रण मिळवले असून, आज रोजी कोरोनाचे सर्वच रुग्ण बरे होऊन घरी परत आले आहेत. अलीकडील काही दिवसांत गावात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. एकूणच, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही, हे यातून दिसत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com