Sand
Sand

यंदाही वाळू लिलावाची शक्‍यता कमीच ! "हे' आहे कारण

सोलापूर : गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या वाळू लिलावाला यंदाच्या 2020 मध्ये देखील मुहूर्त लागण्याची शक्‍यता कमीच आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना आणि नीरा नदीत सध्या पाणी असल्याने वाळू स्थळांचे सर्व्हेक्षण करणे कठीण झाले आहे. ज्यांनी घराची बांधकामे सुरू केली आहेत, त्यांना घराची बांधकामे पूर्ण करण्यासाठी बेकायदा वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे बांधकामांच्या खर्चात वाढ होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. 

पूर्वी चार ते सहा महिन्यांसाठी वाळू ठिकाणांचे लिलाव केले जात होते. नदीतून वाळू उपसा करण्यासाठी यांत्रिक बोटीला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे लिलाव झाल्यानंतरही नदीत पाणी असेल तर वाळू उपसा करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. शासनाने वाळू धोरणात बदल करत एक ते पाच वर्षांसाठी वाळू स्थळांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. या परवानगीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज शाखेच्या वतीने प्रक्रियाही हाती घेण्यात आली होती. मार्चपासून कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत गेले. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमध्ये वाळू लिलावाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी 43 ठिकाणच्या वाळू स्थळांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. या वर्षी वाळू लिलावासाठी वाळू स्थळांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तालुका स्तरावर असलेल्या समितीच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांमध्ये पाणी असल्याने या सर्व्हेक्षणाला विलंब होऊ लागला आहे. ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळा असल्याने नदीतील पाणी किमान ऑक्‍टोबर - नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर सर्व्हेक्षण, जिल्हास्तरीय समितीची मान्यता, राज्यस्तरीय समितीची मान्यता यासह इतर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिसेंबर 2020 पर्यंत होणे सध्या तरी शक्‍य दिसत नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com