esakal | महिलांतील रोगांवर वार करणारी "दूर्गा' डॉ. अर्चना खरे 
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांतील रोगांवर वार करणारी "दूर्गा' डॉ. अर्चना खरे 

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अव्वल 
माहेरी व सासरी कोणतीच वैद्यकिय पार्श्‍वभूमी नसताना परिस्थितीशी दोन हात करत डॉ. अर्चना खारे यांनी मेडिकलमधील पदव्यूत्तर पदवी मिळवत आता लंडनच्या एमआरसीओजी या जगातील नामवंत कॉलेजच्या सदस्यत्वासाठी गवसणी घातली आहे. सोलापूर शहरात केवळ दोनच डॉक्‍टर सध्या या कॉलेजचे सदस्य आहेत. डॉ. खारे यांनी यासाठीच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या असून जून 2021 मध्ये तृतीय परीक्षा देणार आहेत. डॉ. खारे यांचे हॉस्पीटल सध्या सोलापूर शहरात कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात अव्वल स्थानावर आहे. 

महिलांतील रोगांवर वार करणारी "दूर्गा' डॉ. अर्चना खरे 

sakal_logo
By
श्याम जोशी

सोलापूर ः महिलांच्या अरोग्याची काळजी घेताना स्वतःसह कुटूंबियही तिच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तिला कोणता रोग आहे हे समजेपर्यंत खूपच उशीर झालेला असतो. त्यामुळे त्यांच्यात लपलेल्या रोगाचे वेळेत निदान करून त्या रोगाला संपवण्यासाठी "दूर्गा'च बनावे लागत असल्याचे स्त्रीरोग व प्रसुतीरोगतज्ञ डॉ. अर्चना खारे यांनी "सकाळ' ला सांगितले. 

डॉ. खारे म्हणाल्या, "माझे माहेर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव. अर्चना जिरे हे तिकडचे नाव. मालेगावातच आरबीएच कन्या विद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. वडील शासकिय नोकरीत असल्याने शिक्षणासाठी अडचण आली नाही. बारावीनंतर मेडीकल कॉलेजला प्रवेश घेण्याचे निश्‍चित केले. परंतु घरात कोणतीच पार्श्‍वभूमी नसल्याने धाकधूक होती. डॉक्‍टर व्हायचेच हे ठरल्याने नाशिकच्या एनडीएमव्हीपी मेडीकल कॉलेजला प्रवेश घेतला. पदवीनंतर इंटर्नशीप झाली अन्‌ घरात विवाहाची चर्चा सुरू झाली. पती डॉक्‍टर असावा ही किमान अपेक्षा होती. त्यानुसार सोलापूर जवळील कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील डॉ. प्रवीण खारे यांच्याशी 2008 मध्ये विवाह झाला. आमच्या दोघांच्या सहजीवनास सुरवात झाली अन्‌ दीड वर्षात "तपस्या' रूपी एका कोमल कळीने आमच्या आयुष्यात प्रवेश केला. तिच्याच नावाने आम्ही सोलापूरच्या लष्कर परिसरात हॉस्पीटल सुरू केले. पती डॉ. प्रविण यांना साथ देण्यासाठी मी पदव्यूत्तर शिक्षणाचा निर्णय घेतला. त्यानुसार स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रात एमडी केले. 2013 मध्ये ही पदवी संपादन केल्यानंतर हॉस्पीटलची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आली. पती शासकिय सेवेत रूजू झाले. हॉस्पीटलची जबाबदारी आल्यावर महिलांसाठी आवश्‍यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. हॉस्पीटलमध्येच सोनोग्राफी व लॅप्रोस्कोपीची सुविधा सुरू केली. अनेक महिलांच्या तपासणीतून एक गोष्ट पुढे आली की अनेक महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने पछाडले आहे. हा रोग उशीरा लक्षात येतो. अनेकांचा त्यात बळीही जातो. हे थांबले पाहिजे यासाठी ग्रामीण भागात सुमारे शंभर ते दीडशे गावातून या कर्करोगाबाबतच्या शिबीर घेतले. 

त्या पुढे म्हणाल्या, "कोराना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाऊन असले तरी आमचे हॉस्पीटल सेवेसाठी तयार होते. या काळात शासकीय सेवेतील अरोग्य कर्मचाऱ्यांना आम्ही मास्क, फेसशिल्ड, पीपीई कीटचे वाटप केले. सिव्हिल हॉस्पीटलमधील कोरोनाग्रस्त रूग्णांना उत्तम जेवण मिळावे यासाठी गहू व तांदूळ दिले. सध्या हॉस्पीटलमधे सुमारे 15 ते 20 कर्मचारी कम करतात. त्यांचा रोजगार आपल्यावर अवलंबून असल्याने त्यांच्यासह कुटूंबाकडेही लक्ष द्यावे लागते. 2016 मध्ये दुसरी मुलगी झाली. अन्‌ आमचा चौकोन पूर्ण झाल्याने दोन मुलीनंतर संततीनियमन शस्त्रिक्रिया केली. महिलांचे अरोग्यविषयक जागरण करतानाच त्यांच्या उन्नतीसाठीही "दूर्गा' बनून काम सुरू आहे.' 


महाराष्ट्र 
संपादन ः संतोष सिरसट