क्रीडा क्षेत्र गाजवणारी सोलापूरची दुर्गा 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 21 October 2020

स्वाती पुंजाल यांनी नवक्रीडापटूना उद्देशून सांगितले की, खेळाच्या क्षेत्रात जेव्हा मुली दाखल होतात तेव्हा त्यांच्यासमोर खेळात करिअर करण्याच्या अनेक अडचणी असतात. त्यांच्या आईवडिलांची परवानगी, आर्थिक अडचण व बाहेरगावी न जाण्याची सवय या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतात. या प्रसंगात मुलींना साथ दिली तर त्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करतात हे लक्षात घेऊन त्यांना प्रेरित करावे लागते. 

सोलापूर ः आईवडिलांपासून खेळाचा वारसा घेत राष्ट्रीय खेळाडू, पंच व प्रशिक्षक अशा अनेक भूमिकामधून स्वाती श्रीनिवास पुंजाल यांनी खेळातील करिअर यशस्वी करुन दाखवले. एवढेच नव्हे तर अनेक मुलींना आत्मविश्‍वासाने या क्षेत्रात करिअरची संधी मिळवून देण्याचे काम आजही अखंडपणे सुरू आहे. राष्ट्रीयस्तरावर पंच म्हणून कामगिरी केली आहे. 

स्वाती पुंजाल या मुळच्या सोलापूरच्या रहिवाशी. त्यांचे आई व बाबा हे दोघेही खेळाची आवड असणारे आहेत. त्यांच्या आईने स्वाती व त्यांच्या दोनही बहिणींचे स्वभाव ओळखून त्यांना करिअरसाठी दिशा देण्याचे काम केले. शालेय जिवनात खेळाची संधी शाळामधून मिळत नसल्याने त्या श्रीराम स्पोर्टस क्‍लबतर्फे कबड्डी खेळत होत्या. नंतर त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले. त्याच वेळी आपण उत्तम कोच होऊ शकतो, याचा अंदाज त्यांना आला व तशी मनाची तयारी त्यांनी केली. 

विवाहानंतर त्यांच्या सासरी पण क्रीडा क्षेत्राचे वातावरण मिळाले. त्यांचे पती श्रीनिवास हे देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे पुढेही क्रीडाक्षेत्रात करिअर कायम सुरू ठेवण्याची संधी मिळाली. त्यानंतर स्वाती पुंजाल यांनी पुन्हा कबड्डीमध्ये काम करत राज्यस्तरीय कबड्डी पंच झाल्या. पुढे राष्ट्रीयस्तरावर पंच म्हणून कामगिरी केली. प्रशिक्षक म्हणून काम करताना घरगुती अडचणीत सापडलेल्या उत्तम विद्यार्थीनी खेळाडूंना स्पर्धांची संधी देण्यासाठी प्रयत्न सूरू केले. असुरक्षितता, भीती, आत्मविश्‍वास तर कधी आर्थिक अडचणी यातून त्यांनी मुलींची सोडवणूक करत त्यांनी खेळामध्ये सातत्य ठेवावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. अनेक मुली राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचल्या. तसेच त्यांना शासकीय नोकरी मिळून सन्मानाचे जीवन जगण्याची संधी खेळातील करिअरमधून मिळाली. वर्ष 2013 व 2017 मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे मॅनेजर म्हणून काम केले. त्यांची दोन्ही मुले आता हॅंडबॉल खेळात राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. 

स्वाती पुंजाल यांनी नवक्रीडापटूना उद्देशून सांगितले की, खेळाच्या क्षेत्रात जेव्हा मुली दाखल होतात तेव्हा त्यांच्यासमोर खेळात करिअर करण्याच्या अनेक अडचणी असतात. त्यांच्या आईवडिलांची परवानगी, आर्थिक अडचण व बाहेरगावी न जाण्याची सवय या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतात. या प्रसंगात मुलींना साथ दिली तर त्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करतात हे लक्षात घेऊन त्यांना प्रेरित करावे लागते. 

 

ठळक बाबी 

  • लहानपणापासून खेळात करिअरचा ध्यास 
  • राज्य व राष्ट्रीय पातळीवर कामगिरी 
  • दोन वेळा महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक पद 
  • अनेक मुलींना खेळात करिअर करण्याची प्रेरणा 

संपादन : अरविंद मोटे 

महाराष्ट्र सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Durga of Solapur dominating the sports field