
सोलापूर जिल्ह्यातील कारखाना घेतला तर चांगल्या पद्धतीने चालवू
सोलापूर जिल्ह्यातील आर्थिकृष्ट्या अडचणीत आलेले साखर कारखाने आमदार रोहित पवार घेणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. यासंदर्भात आमदार पवार म्हणाले, अडचणीतील साखर कारखाने आम्ही चांगल्या पद्धतीने चालवितो, शेतकऱ्यांना चांगला दर देतो म्हणून आजारी साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकरी अशी चर्चा करत असतील. ही चर्चा चांगलीच आहे. हे आजारी साखर कारखाने घेण्यासाठी प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील एखादा साखर कारखाना आम्ही चालवायला घेतला तर तो अधिक चांगल्या पद्धतीने चालवू असा विश्वासही आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
सोलापूर : सोलापूर शहरातून दरवर्षी चार ते चार ते पाच हजार युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या युवकांना रोजगार नाही म्हणून तेथे स्थलांतरित होतात. सोलापूर शहर व परिसरातील युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्री व्हावी यासाठी प्रयत्न करु. महाविकास आघाडीचे पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड त्यासाठी सक्षम आहेत असा विश्वास कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज व्यक्त केला.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार रोहित पवार म्हणाले, आयटी इंडस्ट्री व येथील एमआयडीसीच्या माध्यमातून सोलापूर शहर व परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्न करू, याशिवाय येथील एमआयडीसीमध्ये अधिक उद्योग आणण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार पवार म्हणाले, शहराच्या विकासासाठी व शहरात नव्याने येणाऱ्या एमआयडीसीच्या विकासासाठी विमानतळ आवश्यक आहे. परंतु विमानतळ नसेल तर विकास होणारच नाही असे नाही. सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. भाजपमधील अनेक नेत्यांचा विवाह लव जिहाद पद्धतीने झाला आहे. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मी त्यामध्ये जास्त खोलात जात नाही, परंतु सध्या युवकांचे प्रश्न वेगळे आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर लव जिहादचा मुद्दा पुढे केला जात आहे. युवकांना सध्या त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने, भाजपने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.