बार्शीतील अपक्षांसह अधिकृत उमेदवारांच्या भवितव्याकडे ग्रामस्थांच्या नजरा

प्रशांत काळे 
Sunday, 17 January 2021

आगळगाव येथे विठ्ठल-रुक्‍मिणी ग्रामविकास आघाडी, पांडुरंग ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत होत असून, जय मल्हार विकास आघाडीने चार उमेदवार उभे करुन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात 78 ग्रामपंचायतींची निवडणूक उत्साहात झाली असून 82 टक्के मतदान झाल्याने कोणाचे पॅनल निवडूून येणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आगळगाव, मळेगाव, उपळाई ठोंगे, धामणगाव दुमाला, खांडवी यासह अनेक गावात चुरशीच्या लढती झाल्या आहेत. माजीमंत्री दिलीप सोपल, विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटासह काही अपक्ष, गावपातळीवरील पॅनल आपले नशीब अजमावत आहेत. कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, अतिवृष्टि यानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने यामुळे खचून गेलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी जनतेमध्ये उत्साह निर्माण होईल का? अशी शंका राजकीय नेत्यांमध्ये होती. पण मतदानाच्या आकडेवारीवरुन ती फोल ठरली आहे.

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
आगळगाव येथे विठ्ठल-रुक्‍मिणी ग्रामविकास आघाडी, पांडुरंग ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत होत असून, जय मल्हार विकास आघाडीने चार उमेदवार उभे करुन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. उपळाई ठोंगे येथे बळीराजा ग्रामविकास आघाडी, पिरशादुल्ला ग्रामविकास आघाडी, जय हनुमान ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये लढत होत आहे. खांडवी येथे खंडेश्वर ग्रामविकास पॅनल, खंडेश्वर विकास पॅनल, खंडेश्वर परिवर्तन पॅनल असा तिरंगी सामना रंगला असून, प्रत्येक पॅनलने आम्हीच विजयी होणार, असा दावा केला आहे. 

हे ही वाचा : मंगळवेढ्यातील सत्तासंघर्षात निवडणुकीला गालबोट ! पराभवाची संक्रांत कोणावर व विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

जलयुक्त शिवारमधून मोठी कामे केली असून ग्रामस्थांना या कामाचा चांगला अनुभव व उपयोग झाला आहे. अंतर्गत रस्ते, गटारी, एलईडी दिवे अशी तीस टक्के कामे राहिली असून सत्तेवर येताच पूर्ण करु. 
- किरण मोरे, आगळगाव 

आमचा पॅनल शंभर टक्के विजयी होणार आहे. छत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कामे केली असून वृक्षारोपण, नेत्ररोग, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत, तर ग्रामस्थांचा गौरव केला आहे. 
- बाळासाहेब पाटील, उपळाई ठोंगे 

खांडवीमध्ये तीन पॅनल उभे आहेत. पण गावात भांडण, तंटा नको, दबावाचे राजकारण करु नये, यासाठी मागील चार निवडणुकांपासून प्रयत्नशील आहे. लोकशाही असावी, दडपशाही नसावी, असे आमच्या पॅनलचे धोरण आहे. 
- गणेश बारंगुळे, खांडवी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of 78 Gram Panchayats has been held in Barshi taluka