.. म्हणून आता घोडेबाजार वाढण्याची शक्यता

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

फायदा आणि तोटाही 
​देवेंद्र फडणवीस सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता. तो रद्द करून आता लोकनियुक्त नगरसेवकांतूनच नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीवेळी घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने विकासकामासंदर्भात तातडीने निर्णय होऊ शकतात हा फायदाही आहे. 

सोलापूर ः फडणवीस सरकारच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला. यापुढे लोकनियुक्त नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला आहे. फडणवीस सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्यातील कॉंग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा नगरसेवकांतून निवड होणार असल्याने घोडाबाजार होण्यासह सहली आणि अज्ञातस्थळी जाण्याचे प्रमाण वाढणार आहे. 

दोन महत्वाचे निर्णय
महाराष्ट्रातील तत्कालीन फडणवीस सरकराने दोन महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यापैकी महापालिकांसाठी चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग पद्धत आणि दुसरा म्हणजे जनतेतून नगराध्यक्षांची निवड. या दोन्ही निर्णयाचा तत्कालीन फडणवीस सरकारला खूप फायदा झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. नोव्हेंबर 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीत झालेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत एकूण 219 नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले. त्यापैकी तब्बल 84 नगराध्यक्ष हे भाजपचे होते. बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे असताना सरपंच, नगराध्यक्ष मात्र भाजपचे अशी परिस्थिती काही ठिकाणी सध्याही आहे. 

हेही वाचा - खुल्या जागेवरील युजर चार्जेस रद्द 

बहुमत इतर पक्षाचे ; नगराध्यक्ष भाजपचा
भाजप सरकार 2014 मध्ये राज्यात सत्तेत आले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादीचीच मक्तेदारी होती. अशावेळी योग्य प्रचारयंत्रणा वापरुन थेट नगराध्यक्ष किंवा सरपंचच निवडून आणला तर बहुमत असूनही सत्तेवर अंकुश ठेवता येईल. यातूनच फडणवीस सरकारने 2016 मध्ये हा निर्णय घेतला होता. यापूर्वीही कॉंग्रसने असा निर्णय घेतला होता. मात्र, एकच वर्षानंतर तो मागे घ्यावा लागला होता. पण, भाजपला मात्र या निर्णयाचा चांगला फायदा झाला. आता महाविकास आघाडीने पुन्हा नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. 

हेही वाचा - राज्यातील 288 आमदारांना बोनस 

सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान नगराध्यक्ष 
बार्शी - आसिफ तांबोळी शिवसेना 
कुर्डवाडी -  समीर मुलाणी शिवसेना 
करमाळा - वैभवराजे जगताप कॉंग्रेस 
सांगोला - राणी माने महायुती 
पंढरपूर - साधना भोसले भाजप 
मंगळवेढा - अरुणा माळी राष्ट्रवादी कॉंग्रेस 
अक्कलकोट - शोभा खेडगी भाजप 
दुधनी - भीमाशंकर इंगळे भाजप 
मैंदर्गी - दिप्ती केसूर भाजप 
माढा - मिनल साठे भाजप 
माळशिरस - द्रोपदी देशमुख भाजप 
मोहोळ - वंदना सुरवसे राष्ट्रवादी कॉंग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election of president of municipalty in solapur