
सुरवातीला कर्जमुक्ती योजना आणि मधल्या काळात कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सोलापूर : सुरवातीला कर्जमुक्ती योजना आणि मधल्या काळात कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, संत दामाजी सहकारी साखर कारखाना आणि भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता येत्या काळात होणार आहे.
जिल्हा दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीचा विषय पेटलेला असताना कोरोनाच्या संकटामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. जवळपास एक वर्षापासून जिल्हा दूध संघाची ही प्रक्रिया थांबली होती. आता या प्रक्रियेला गती येणार आहे. क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदांचा मुद्दा देखील ऐरणीवर येणार आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची मुदत यापूर्वीच संपली आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक तातडीने पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 26 जानेवारी 2021 रोजी पूर्ण झाली आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेली पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळपास होण्याची शक्यता आहे.
मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 17 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण होत आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक आणि दामाजी सहकारी साखर कारखाना यामुळे देखील या निवडणुकीत मोठी चुरस दिसणार आहे. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 27 मार्च 2021 रोजी पूर्ण होत आहे. या कारखान्याच्या निवडणुकीचा देखील मार्ग मोकळा झाला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळालेली आहे. ज्या संस्थांच्या संचालकांची मुदत संपली आहे त्यांच्या निवडणुका प्रथम प्राधान्याने घेण्यात येतील. अंदाजे 2 हजार 703 सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होण्याची शक्यता आहे. या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली जात आहे.
- कुंदन भोळे,
जिल्हा उपनिबंधक
संपादन : श्रीनिवास दुध्याल