भाजपला नव्हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पाठिंबा दिला होता : संजय शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

माढा प्रेस क्‍लबने दिवंगत पत्रकारांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम म्हणून आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. आमदार संजय शिंदे यांनी अनेक प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक आहे म्हणून बॅंक सुस्थितीत आहे.

माढा (सोलापूर) : माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरायला आवडेल. कुटुंबात माझे सर्वाधिक प्रेम आमदार बबनराव शिंदे यांच्यावर आहे. जिल्हा बॅंकेवर प्रशासकच असावा, अशी भूमिका करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना मांडली. 
माढा प्रेस क्‍लबने दिवंगत पत्रकारांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम म्हणून आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. आमदार संजय शिंदे यांनी अनेक प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक आहे म्हणून बॅंक सुस्थितीत आहे. बॅंकेवर आणखी काही काळ प्रशासक राहणे गरजेचे आहे. निवडणुका घेण्याची घाई करू नये, अशी माझी भूमिका असून सरकारला पाठिंबा दिलेला आमदार म्हणून देखील माझी हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. 
मोहिते-पाटील व शिंदे कुटुंबाचा संघर्ष हा व्यक्तिद्वेषाचा नसून तो वैचारिक आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील या दोघांपैकी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास आवडेल. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील व रश्‍मी बागल या दोघांपैकी नारायण पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यास आवडेल, असे त्यांनी सांगितले. करमाळा मतदारसंघात माजी आमदार धनाजीराव साठे व जयवंतराव जगताप या दोघांचीही मदत अधिक महत्त्वपूर्ण ठरली, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे व पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांच्यापैकी कोणीचे राजकीय भविष्य अधिक उज्ज्वल आहे, यावर राजकारणात ज्याचे कर्तृत्व अधिक चांगले त्याचे भवितव्य अधिक उज्ज्वल असते असे सांगितले. 

"आदर्श शरद पवार, पाठिंबा फडणवीसांना' 
आमदारकीपेक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून जनतेची अधिक कामे करता येत असल्याने आमदारकीपेक्षा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अधिक आवडीचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी शरद पवार हे माझे आदर्श आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. सुरवातीला भारतीय जनता पक्षाला नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, असे संजय शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrevista con MLA Sanjay Shinde