सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 75 महसूल मंडळात अतिवृष्टी, बचावकार्य युध्द पातळीवर सुरु 

प्रमोद बोडके
Friday, 16 October 2020

तळेगाव, कोल्हापूर येथील बोट 
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील 7 रेसक्‍यु बोट, कोल्हापूर येथील चार रेसक्‍यू बोट दाखल होत आहेत. मोहोळ तालुक्‍यातील अर्जूनसोंड, आष्टे, हिंगणी, नरखेड, मलिकपेठ, डिकसळ, खरकटणे, वाळूज, कोळेगाव, पापरी अक्कलकोट तालुक्‍यातील रामपूर, तळेवाड, बिजंगे, संगोगी, हाळहल्ली, बार्शी तालुक्‍यातील मुंगशी, सासुरे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनूसार सोलापूर जिल्ह्यातील चौदा जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 565 गावांना महापूराचा फटका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यात असलेल्या 91 महसूल मंडळापैकी तब्बल 75 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या महसूल मंडळात एका दिवसात 65 मिली मिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांसह मोठे ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. महापूरामुळे जिल्ह्यातील 4 हजार 895 घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. महापुरामुळे 4 हजार 835 कुटुंबातील 17 हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास 179 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या महापुरात आतापर्यंत 365 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 716 घरांची पडझड झाली आहे. महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व एनडीआरएफ यांच्यावतीने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. महापुराचा धोका असलेल्या गावांमधील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, साखर कारखाना, समाज मंदिर अथवा बाधितांच्या नातेवाईकांच्या घरी, मठांमध्ये पुरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extreme rainfall in 75 revenue boards in Solapur district, rescue work started at war level