नाव एकाचे तर पैसे दुसऱ्याच्या खात्यावर 

Farmers money in another account in Solapur district
Farmers money in another account in Solapur district

सोलापूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेकडे पाहिले जाते. मात्र, या सन्मान योजनेतही प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करून शेतकऱ्यांचा अपमान करण्याचेच काम सुरू आहे. पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथील एका शेतकऱ्याचे पैसे त्याच गावातील दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. 
पाथरी येथील रामचंद्र कोले या शेतकऱ्याचा समावेश पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत झाला आहे. प्रशासनाने मागितलेल्या कागदपत्रांप्रमाणे सगळी कागदपत्रे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिली. मात्र, प्रशासनाकडून त्या शेतकऱ्याच्या बॅंकेचा खातेनंबर टाकताना चूक केली. ती चूक त्या शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड देणारी ठरली आहे. श्री. कोले यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे दिल्यानंतर संगणकावर माहिती भरताना त्यांनी कोले यांच्या नावासमोर गावातील दुसरे शेतकरी दत्तात्रय लांडे यांचा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा खाते क्रमांक भरला आहे. नाव एकाचे व खाते नंबर दुसऱ्याचा असल्यामुळे कोले यांचे पैसे लांडे यांच्या बॅंकेतील खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभार्थी होऊनही प्रत्यक्षात त्याचा लाभच मिळाला नसल्याचे या प्रकरणावरून दिसून येते. 

तलाठ्याने बदल केला नाही 
माझ्या नावासमोर दुसऱ्या शेतकऱ्याचा खातेनंबर टाकला आहे. हे संबंधित तलाठ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यामध्ये बदल केला नाही. त्यामुळे या योजनेचे माझ्या नावाने आलेले पैसे दुसऱ्या शेतकऱ्याने घेतले आहेत. तलाठ्यांनी न ऐकल्याने शेवटी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. तहसीलदारांकडून मला न्याय मिळेल ही अपेक्षा. 
- रामचंद्र कोले, शेतकरी, पाथरी 

बॅंकेला सूचना 
पाथरीच्या शेतकऱ्याचा तक्रारी अर्ज माझ्याकडे आला आहे. त्याबाबत संबंधित तलाठी व मंडलाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. त्यांना त्या शेतकऱ्याच्या खाते क्रमांकात दुरुस्ती करून तशाप्रकारचे पत्र बॅंकेला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- जयवंत पाटील, तहसीलदार, उत्तर सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com