पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना 'असा' मिळणार कर्जमाफीचा लाभ 

भारत नागणे 
मंगळवार, 28 जानेवारी 2020

15 फेब्रुवारीपर्यंत जमा होणार रक्कम 
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची माहिती पूर्ण केली आहे. पंढरपूर तालुक्‍यातील 51 बॅंक शाखांमधील सुमारे 15 हजार 515 थकबाकीदार शेतकऱ्यांना 142 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याप्रमाणे या योजनेला गती आली आहे. 
- एम. एस. तांदळे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर 

पंढरपूर (जि. सोलापूर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला गती आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. कर्जमाफी संदर्भातील पंढरपूर तालुक्‍यातील संपूर्ण माहिती शासनाला कळवण्यात आली आहे. तालुक्‍यातील 15 हजार 515 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना सुमारे 142 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. 

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंढरपुरात आंदोलन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून त्यांचा सात बारा उतारा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडीनंतर उध्दव ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. 
विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत बोलून दाखवला होता. त्यानुसार राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. 

हेही वाचा - मंगळवेढ्याला आंदोलनाचा वेढा! कसा तो वाचा... 

शासन अध्यादेशानुसार शेतकरी कर्जमाफीची माहिती संकलीत केली आहे. पंढरपूर तालुक्‍यातील सहकारी आणि राष्ट्रीयकृत अशा 51 बॅंक शाखांमधील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पूर्ण झाली आहे. यामध्ये 15 हजार 515 थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना सुमारे 142 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी सर्व माहिती संगणकावर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून मंजूर याद्यांचे ग्रामपंचायतस्तरावर वाचन केले जाणार आहे. त्यानंतर महा ई-सेवा केंद्र आणि प्रत्येक बॅंक शाखेमध्ये पडताळणी केली जाणार आहे. कर्ज खात्याची खात्री झाल्यास शेतकऱ्यांनी मशिवर थम दिल्यास त्याचवेळी त्यांच्या कर्जखात्यावर पैसे जमा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Pandharpur taluka benefit from loan waiver of Rs 142 crore