
पिंंपळनेर(सोलापूर)ः मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऊसाची नोंदणी होणार असल्याने शेतकऱ्यांचा ऊस विना तक्रार वेळेवर गाळपास आणणे सोपे होणार आहे. साखर कारखानदारीत गाळपासाठी द्यावयाच्या ऊस कारखान्यात पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. या अडचणी दुर करण्यासाठी मोबाईल ऍपचा उपयोग करण्याचा निर्णय विठ्ठलराव शिंदे सह.साखर काऱखान्याने घेतला आहे.
येथील विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखान्यातर्फे सन 2020- 2021 चे ऊस लागवड धोरण जाहीर करण्यात आले आहे. साखर उताऱ्यात (रिकव्हरीत) वाढ करणेसाठी कमी साखर उतारा देणाऱ्या वाणाची लागवड न करता नवीन विकसित वाणाची (जादा शर्करायुक्त) लागण करणे हेच प्रमुख उदिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
ऊस लागवड धोरणाबाबत आमदार शिंदे यांनी नमूद केले की, मागील वर्षी खुपच उशीरा पाऊस झाल्याने 2019-2020 च्या गळीत हंगामात खोडवा, निडवा, आडसाली व सुरू हंगामाचा ऊस गळीतास आल्याने साखर उताऱ्यात घट सोसावी लागली.
चालू 2020-2021 लागवड धोरणांमध्ये कोसी 671, को 86032, एम.एस 10001 व व्ही.एस.आय 8005 या वाणाची शेतकऱ्यांनी लागवड करणे आवश्यक आहे. कोएम 265 या कमी साखर उतारा असणाऱ्या वाणाची लागण करू नये. हा ऊस गळीतास स्विकारला जाणार नाही.
जादा साखर उतारा असलेल्या वाणाची लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती टन 100 रूपये अनुदान देण्यात येणार आहे. 2020-2021 या हंगामासाठी विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखान्याचा वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांचेकडून मागील वर्षी मुलभूत निवडलेले बेणे आणून निवडक शेतकऱ्यांच्या शेतात प्रमाणीत बेणे प्लॉट तयार केले आहेत.
सदर बेणे बेणे प्लॉट धोरणानुसार अतिशय निरोगी व चांगले आहे. शेतकऱ्यांनी या बेण्याची लागवड करावी. ऊस लागवड करताना शेतकऱ्यांनी दोन सरीमधील अंतर पाच ते सहा फुट ठेवावे. आडसाली व पुर्व हंगामी लागणीसाठी दोन डोळ्याची एकरी आठ हजार टिपरी वापरावी. तर सुरू हंगामासाठी 10 हजार टिपरी वापरावीत. शेणखताबरोबरच हिरवळीचे खताची पेरणी करावी व फुलोरा येताच हे ऊसाच्या बुडात गाडून टाकावे. ऊसाला हे खत अतिशय उपयुक्त ठरते. कारखान्यामार्फत मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट व मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य व कंपोस्ट खत उधारीने देण्यात येणार आहे. तसेच कारखान्यातर्फे माती परिक्षण प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांनी जमिनीची प्रत(माती परिक्षण) तपासणी करावी त्यानुसारच खतांचा व पाण्याचा वापर करावा.
16जुलै ते31ऑगस्ट हा कालावधी आडसाली लागणीसाठी कोसी 671, को86032 ची लागण करावी. 1 सप्टेंबर ते 30नोव्हेंबर पर्यंत पूर्वहंगामासाठी वरील दोन्ही वाणासह व्हिएसआय 8005व एम.एस 10001 या वाणाची लागवड करावी. 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी हा सुरू लागणीच्या हंगामात वरीलपैकी कोणत्याही वाणाची लागवड करता येईल. ठिबक सिंचन शिवाय लागवड करू नये. ऊस तोडणी वेळेवर होणेसाठी लागवड पुर्ण होताच कारखान्याकडे नोंद द्यावी. मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऊसाची नोंदणी होणार असल्याने शेतकऱ्यांचा ऊस विना तक्रार वेळेवर गाळपास आणणे सोपे होईल. अनेक वर्षापासून साखर कारखानदारीत गाळपासाठी द्यावयाच्या ऊसाच्या साठी अनेक अडचणी येतात. त्या अडचणी मोबाईल ऍपद्वारे झालेल्या नोंदणीनुसार दूर होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.