कुठल्याही राजकीय मध्यस्थांशिवाय शेतकऱ्यांनी घेतली करकंब गावतळ्याच्या प्रश्‍नासाठी शरद पवारांकडे धाव ! 

सूर्यकांत बनकर 
Friday, 13 November 2020

करकंब येथील शिवकालीन गावतळ्यात मोडनिंब वितरिकेतून पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी सोडण्यात यावे, यासाठी येथील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन शरद पवार यांना बारामती येथे जाऊन देण्यात आले. 

करकंब (सोलापूर) : करकंब येथील शिवकालीन गावतळ्यात मोडनिंब वितरिकेतून पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी सोडण्यात यावे, यासाठी येथील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन शरद पवार यांना बारामती येथे जाऊन देण्यात आले. 

करकंबच्या पश्‍चिम भागातून उजनीचा डावा कालवा गेला असल्याने त्या भागातील शेती ओलिताखाली आहे. मात्र पूर्व भाग आणि बार्डी गावास कायमच अवर्षणाचा सामना करावा लागतो. असे असले तरी करकंब गावास लागून पूर्वेला 45 एकराचे शिवकालीन गावतळे पाण्याने भरले तर या भागातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकांमध्ये या तळ्यात पाणी सोडण्यासाठी सर्वच पक्षांकडून आश्वासने दिली जातात; मात्र कार्यवाही होत नाही. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 2012 मध्ये या तळ्यातील सर्व गाळ केवळ लोकवर्गणीतून काढण्यात आला आहे. त्यामुळे त्याची साठवण क्षमता वाढली आहे. पण दुर्दैव असे, की त्यानंतर तळ्यात पुरेसे पाणीच आले नाही. या तळ्यापासून केवळ तीन किलोमीटरवरून उजनीचा डावा कालवा तर चार किलोमीटरवरून मोडनिंब वितरिका गेलेली आहे. त्यामुळे या तळ्यात अतिरिक्त पाणी सोडणे सहजशक्‍य आहे. पण केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी अद्याप तळ्यात पाणी येऊ शकले नाही. परिणामी आता शेतकऱ्यांनीच हा प्रश्न हातात घेतला असून, कोणत्याही नेत्याशिवाय पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन प्रकाश नागरस, अजितसिंह देशमुख, सुधीर मगदुम, मिथुन चंदनशिवे, विजयसिंह निकम, अशोक देशमुख, जयंत मगदुम आदींनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांना दिले आहे. 

शरद पवार यांनी लगेच सूत्रे फिरविली 
करकंब येथील शेतकऱ्यांचे मोडनिंब वितरिकेवरील मायनर क्रमांक सात व आठमधून करकंब गावतळ्यात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन हातात पडताच लगेच शरद पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना या निवेदनाची प्रत पाठवून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या. शिवाय उपस्थित शेतकऱ्यांनाही जयंत पाटील यांच्याकडे एक निवेदन देऊन त्याची स्थळप्रत त्यांच्याकडे पाठवून देण्यास सांगितले. शिवाय तळ्यात जेथून पाणी सोडता येऊ शकते त्याचा तज्ज्ञ व्यक्तीकडून नकाशाही काढून पाठविण्याची सूचना दिल्याची माहिती सुधीर मगदुम यांनी "सकाळ'ला दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers visit Sharad Pawar to release water in Karkamb pond