शेतकऱ्यांना महाबीजच्या बियाणांची आता प्रतीक्षा 

biyane.jpg
biyane.jpg

सोलापूरः बियाणे व खतांच्या बाजारपेठेत अनेक बियाणे कंपन्यांनी माल उतरवला असला तरी महाबीज बियाणे बाजारात अद्याप आलेले नाही. त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी केंद्रांवर या बियाणासाठी चकरा मारत आहेत. 

बियाणे व खतांचा हंगाम सुरू झाला आहे. शहराच्या बाजारात शेतकरी बियाणे खरेदीसाठी येऊ लागले आहेत. कांदा, सोयाबीन, उडीद, मका आदी पिकांसाठी बियाणे खरेदी केली जातात. अनेक कंपन्यांची बियाणे विक्रीस आली आहेत. महाबीजच्या बियाण्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद असतो. शासनाच्या महामंडळाचे असल्याने त्याची विश्‍वसनीयता शेतकऱ्यांना महत्त्वाची वाटते. 

सोयाबीनचे महाबीज वाण 335 व 228 हे बियाणे शेतकरी वापरतात. या हंगामात कांद्याची लागवड पाऊस सुरू होण्यापूर्वी केली जाते. त्यासाठी पंचगंगा या महाबीजच्या वाणाची मागणी होत आहे. एएफडीआर व येलोरा या वाणालाही चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांकडून मागणी होत असली तरी अद्याप महाबीजकडून या बियाणांचा पुरवठा बाजारात झालेला नाही. मालाची मागणी विक्रेत्यांकडून महाबीजने नोंदवलेली होती. अजूनतरी पुरवठा झालेला नाही. येत्या पाच ते सहा दिवसांत सर्व कंपन्यांचा माल पोचल्यानंतरच खरीप हंगाम बियाणे खरेदीला जोर येणार आहे. या वर्षी हंगामात पाऊस वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बियाण्यासाठी विचारणा होत आहे. बियाणे व खतासाठी मालवाहतुकीचा अडथळा फारसा राहिला नाही. एक तर हंगाम सुरू होण्याआधी उत्पादकांनी मागणी नोंदवून माल पाठवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पुरेसा साठा झाला आहे. 


कर्नाटकच्या शेतकऱ्यांची अडचण 
सोलापूर बाजारपेठ ही कर्नाटकाशी जोडलेली आहे. कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने या बाजारपेठेत येऊन खते व बियाणांची खरेदी करत असतात. मात्र, यावेळी कोरोना संकटामुळे त्यांना सोलापुरात खरेदी करता येणार नाही. त्यातच कोरोना संकटाची स्थिती गंभीर झाल्याने त्यांना सोलापुरात येणे अशक्‍य झाले आहे. यासोबत तालुक्‍याच्या ठिकाणाहून देखील शेतकरी येऊ शकणार नाहीत. त्यामुळे बियाणे बाजारपेठेला 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आर्थिक फटका बसणार आहे. 


पुरवठा होताच शेतकऱ्यांना मिळेल बियाणे 
महाबीज बियाणाचा पुरवठा सुरू झाला की ते शेतकऱ्यांना लगेचच उपलब्ध केले जाईल. त्यासाठी मागणी नोंदवलेली आहे. 
- विजयकुमार कुसेकर, बियाणे विक्रेता  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com