पेट्रोल आणायला गेले अन् परत आलेच नाहीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

सोलापुरातील एका खासगी दवाखान्यांमध्ये चीफ अकाउंटंट म्हणून काम करणारे नागराज सिद्रामप्पा कऱ्हाळे (रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती) हे त्यांच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन पेट्रोल आणायला जातो म्हणून शुक्रवारी (ता. 15) घराबाहेर पडले. खूप वेळ झाला तरीही ते घरी परतल्याने त्यांच्या पत्नीने नातेवाईकांना संपर्क साधला. त्यानंतर पत्नीने जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दाखल केली. पोलिसांनी त्यांचा मोबाईल ठेवला आणि शुक्रवारी सकाळी 8.15 च्या सुमारास विजापूर नाका येथे त्यांचे लोकेशन समजले. त्या परिसरात सासरवाडी असल्याने त्या ठिकाणी ही चौकशी केली, परंतु ते त्याठिकाणी आलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडलेच नाहीत. शेवटी शनिवारी (ता. 16) विजयपुरजवळील झळकी येथील बंधाऱ्यात त्यांच्या लहान मुलासह नागराज कन्हाळे यांचा मृतदेह आढळला.

सोलापूर : शहरातील एका खाजगी रुग्णालयात चिफ अकाउंटंट या पदावर नोकरी करणारे नागराज सिद्रामप्पा कन्हाळे यांचा त्यांच्या पाच वर्षाच्या लहान मुलासह कर्नाटकातील झळकी येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यात मृतदेह सापडला आहे. त्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, त्या ठिकाणी ते कसे पोहोचले याचा शोध पोलीस घेत आहेत.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे करा क्लिक 

कर्नाटकातील भीमा नदीवरील जळकी येथील बंधाऱ्यावर नागराज कन्हाळे यांची दुचाकी पोलिसांना आढळून आली. शनिवारी (ता. 16) सकाळी सव्वाआठच्या सुमारास पोलिसांना नागराज कन्हाळे यांच्या लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. दुचाकी असल्याने  त्या दुचाकीस्वाराचा शोध तेथील मच्छीमारांच्या साह्याने पोलिसांनी सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारास नागराज यांचा मृतदेह सापडला त्यांच्या खिशातील कागदपत्रावरून सोलापूर पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी, झळकी पोलिसांनी मंद्रूप पोलीस ठाण्याशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. नातेवाईक झळकी येथे आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नागराज करणाऱ्यांच्या मुलासह बंधाऱ्यात पाणी प्यायला गेल्यानंतर पाय घसरून पडले असतील, अशी शक्यता त्यांच्या पत्नीने व्यक्त केल्याचे झळकी पोलिसांनी सांगितले.

घोंगडे वस्ती, भवानी पेठ परिसरातील नागराज सिद्रामप्पा कन्हाळे हे त्यांच्या मुलासह घराबाहेर पडले. परंतु, ते परत आलेच नाहीत, अशी मिसिंग तक्रार त्यांच्या पत्नीने शुक्रवारी (ता. 15) दाखल केली होती. त्यानुसार त्यांचा मोबाईल ट्रेस करूनही त्यांचा पत्ता लागला नाही. घरगुती कारणावरून त्यांनी घर सोडल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले मात्र, शनिवारी (ता. 16) कर्नाटकातील झळकी येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यात त्यांचे मृतदेह सापडले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कन्हाळे यांनी त्यांच्या मुलासह कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, त्या ठिकाणी ते कसे पोहोचले, याचा शोध घेतला जाईल.
- शिवशंकर बोंदर, पोलिस निरीक्षक, जोडभावी पेठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and son commit suicide in Solapur