सदोष पर्जन्यमापन पद्धतीचा शेतकऱ्यांना विमा भरपाईमध्ये फटका  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

तालुक्‍यातील नऊ मंडलच्या ठिकाणी पाऊस मोजण्याची पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. यावरून तालुक्‍यातील 103 गावांत पडलेल्या पावसाची आकडेवारी ठरवली जाते. प्रत्येक गावात कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस झाला तरीही पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या ठिकाणी जेवढा पाऊस झाला तीच आकडेवारी संपूर्ण मंडलसाठी ग्राह्य धरली जाते. यामुळे शासनाला गावातील चुकीची आकडेवारी मिळत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जाते. 

सांगोला(सोलापूर): पावसाळ्याच्या सुरवातीलाच मृग नक्षत्रात सर्वदूर समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तरीही पडलेला पाऊस मोजण्याच्या पद्धतीवरून सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांत नाराजी असल्याचे दिसत आहे. तालुक्‍यात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीनुसारच विमा कंपन्यांची आणि शासनाची धोरणे ठरतात. प्रत्येक गावात पाऊस मोजणी यंत्रे असावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

हेही वाचाः अक्कलकोटमध्ये आणखी एक कोरोनाबाधित आढळला 

तालुक्‍यातील नऊ मंडलच्या ठिकाणी पाऊस मोजण्याची पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. यावरून तालुक्‍यातील 103 गावांत पडलेल्या पावसाची आकडेवारी ठरवली जाते. प्रत्येक गावात कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस झाला तरीही पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या ठिकाणी जेवढा पाऊस झाला तीच आकडेवारी संपूर्ण मंडलसाठी ग्राह्य धरली जाते. यामुळे शासनाला गावातील चुकीची आकडेवारी मिळत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जाते. 

हेही वाचाः त्यांच्या आठवणीचा हिरवागार बहर झालाय पंचवीस वर्षाचा 

सांगोला तालुक्‍यात 103 लहान-मोठी गावे व 76 ग्रामपंचायती अस्तित्वात असताना सांगोला, जवळा, कोळा, महूद, हातिद, संगेवाडी, शिवणे, नाझरा व सोनंद अशा नऊ मंडल ठिकाणीच पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहेत. नऊ मंडलांत तालुक्‍यातील 103 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पर्जन्यमापक यंत्र असलेल्या ठिकाणी जेवढा पाऊस पडेल तीच आकडेवारी त्या मंडलातील सर्व गावांसाठी अधिकृत मानली जाते. 16 जूनला सांगोला तालुक्‍यात एकूण 388 मिलिमीटर पाऊस पडला. यापैकी एकट्या संगेवाडी मंडलात तब्बल 107 मिलिमीटर पाऊस एकाच दिवसात झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली. मात्र, प्रत्यक्ष या मंडलातील सर्व गावात येवढा पाऊस झाला नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. शिवाय सांगोला 62, शिवणे 60, महूद 42, सोनंद 23, जवळा 21, कोळा 15, नाझरा 11 व हातिद सात मिलीमीटर अशी पावसाची आकडेवारी नोंद करण्यात आली. यात सांगोला मंडलात समावेश असलेल्या आलेगावात मंडलच्या अधिकृत आकडेवारीनुसार 62 मि. मी. येवढ्या पावसाची दप्तरी नोंद आहे. प्रत्यक्षात आलेगाव व सांगोला या दोन गावांत तब्बल 15 ते 16 किलोमीटर अंतर आहे. तर दुसऱ्या बाजूला आलेगावपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जवळा गावात व एकूण मंडलात मात्र 21 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हीच परिस्थिती सांगोला तालुक्‍यातील अन्य गावात जशीच्या तशी आहे. 

गतवर्षीची पुनरावृत्ती होऊ नये 
प्रशासनाला प्राप्त झालेली आकडेवारी शासनाकडे सादर होते. यावरूनच शासनाची व विमा कंपन्यांची धोरणे ठरवली जातात. अशावेळी खरोखर प्रत्यक्षात पाऊस पडलेला नसताना विनाकारण शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याची आकडेवारी मिळाल्याने विमा कंपन्यांनी जवळा व महुद मंडलातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वगळले होते. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदाही प्रशासकीय आकडेवारीनुसार त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रत्येक गावात मोजणी यंत्रे हवीत  

मंडलनिहाय ऐवजी प्रत्येक गावात पाऊस मोजणीचे यंत्रे बसविली जावीत. मंडलनिहाय पाऊस मोजणीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. 
- धनंजय चव्हाण, डाळिंब उत्पादक शेतकरी, हलदहिवडी, ता. सांगोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Faulty rainfall measurement system hits farmers in insurance compensation