"बर्ड फ्लू'च्या भीतीने घटली चिकन विक्री ! 200 वरून आला 120 रुपये किलो दर 

bird_flu_poultry.
bird_flu_poultry.

केत्तूर (सोलापूर) : राज्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका सध्यातरी नाही, असे आरोग्य खात्यामार्फत सांगितले जात असले तरी, राज्यात कावळे, पोपट हे पक्षी मात्र मरण पावण्याच्या घटना घडत आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा रोग पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा धोका असल्याने त्याचा फटका मात्र पोल्ट्री व्यवसायाला बसत असून, हा व्यवसाय पुन्हा संकटात सापडला आहे. चिकन विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. चिकनचा दर 200 रुपयांवरून थेट 120 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. 

गतवर्षात कोरोना महामारीच्या संकटात सर्वाधिक फटका चिकन व्यावसायिकांना बसला होता. चिकन खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, अशी अफवाही सुरवातीच्या काळात पसरल्यामुळे पोल्ट्री धारकांनी रोगाच्या भीतीने पोल्ट्रीमधील जिवंत कोंबड्या पुरून टाकल्या होत्या तर काहींनी फुकट तर काहींनी स्कीम लावून कमी किमतीमध्ये कोंबड्या विकल्या. परंतु पुढे ही अफवा असल्याचे डॉक्‍टर मंडळींनी सांगितले व चिकन उद्योग सावरला गेला. त्यास सुगीचे दिवस आले होते. चिकन 200 रुपये तर अंडे सात रुपये नग विकले जात असल्याने हा व्यवसाय सावरत असतानाच, वर्षाच्या प्रारंभीच बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने पोल्ट्री उद्योगापुढे भीती निर्माण झाली आहे. यामुळे चिकन उद्योग मात्र संकटात सापडला आहे. 

त्यातच परभणीमध्ये 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मांसाहार प्रेमींमध्ये मात्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. चिकन व अंडी खाताना ते चांगले शिजवून खावेत असे आवाहन डॉक्‍टर मंडळींकडून करण्यात येत आहे. शक्‍यतो पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये, असेही डॉक्‍टर मंडळींनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत अलर्ट दिला असून पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी एक पक्षी मृत आढळल्यास त्वरित तपासणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. 

उजनी जलाशयावर मोठ्या प्रमाणावर दरवर्षी स्थलांतरित पक्षी हजेरी लावतात. या ठिकाणीही लक्ष ठेवले जात असल्याचे समजते. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांत बर्ड फ्लूची साथ आली आहे. यापूर्वी राज्यात 2006 मध्ये बर्ड फ्लूचे आगमन झाले होते. त्या वेळी राज्यात सुमारे अडीच लाख कोंबड्या तर पाच लाख अंडी नष्ट करण्यात आली होती. 

बर्ड फ्लूची लक्षणे 
ताप येणे, घशात खवखवणे, सर्दी, श्वास घेण्यात अडचण, पित्त व कफाचा त्रास ही सगळी लक्षणे कोरोना संसर्गासारखीच आहेत. 

एवियन इन्फ्लुएंझा (Avian influenza) नावाच्या विषाणूने बर्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार पक्ष्यांमध्ये होतो. या विषाणूंचा फैलाव स्थलांतर करून येणाऱ्या पाणपक्ष्यांमधून होतो. जर स्थलांतरित पाणपक्षी कोंबड्या, कबुतर, बदक, शहामृग, इमू यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर हा आजार फैलावतो. सामान्यपणे या विषाणूचा मानवी आरोग्यावर परिणाम होत नाही. 
- डॉ. अरविंद कुंभार, 
पक्षी व प्राणिशास्त्र अभ्यासक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com