तरुणांनो, घ्या यांचा आदर्श ! सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याने वयाच्या पासष्टीनंतर पूर्ण केल्या 15 हाफ मॅरेथॉन स्पर्धा 

Jadhav
Jadhav

कुर्डुवाडी (सोलापूर) : रेल्वे अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले कुर्डुवाडी येथील सूर्यकांत जाधव यांनी 65 वर्षे वयानंतरसुद्धा विविध शहरांतील तब्बल 15 हाफ मॅरेथॉन (प्रत्येकी 21.1 किमी) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका हाफ मॅरेथॉनचा सामावेश आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी सुमारे 50 पेक्षा जास्त एकांकिका व नाटकांच्या प्रकाश योजनेची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. 

श्री. जाधव यांचे वडील रेल्वेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची होती. बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा प्रारंभ रेल्वेतील कनिष्ठ लिपिक पदावरून सुरू केला. परंतु ते नोकरीत समाधानी नसल्याने त्यांनी पुढील परीक्षा देत टेक्‍निकल पोस्ट मिळवली. त्यांची सेवा मुंबई, कुर्डुवाडी, पुणे, दौंड, नागपूर आदी शहरांत झाली असून रेल्वेतील असिस्टंट केमिस्ट अँड मेटर्लजिल्ट या गॅझेटेड पदावरून ते सेवानिवृत्त झाले. 1976 पासून ते दररोज सुमारे सहा किलोमीटर मॉर्निंग वॉकला जातात. 

श्री. जाधव म्हणाले, तीन वर्षांपूर्वी सहकारी दास गोरे मॉर्निंग वॉकला गेले असताना कुर्डुवाडी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ चंद्रशेखर साखरे यांची भेट झाली. डॉ. साखरे यांनी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यावयास प्रेरणा देत मार्गदर्शनही केले. तेव्हापासून कोरोनाच्या लॉकडाउनपर्यंत प्रत्येकी 21.1 किमी अंतर असलेल्या 15 मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. 

काही स्पर्धांमध्ये त्यांच्या पत्नी इनरव्हील क्‍लबच्या माजी अध्यक्षा विजया जाधव यांनीही सहभाग नोंदवला आहे. श्री. जाधव यांनी सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, न्यूयॉर्क येथील हाफ मॅरेथॉन व पंढरपूर येथील शॉर्टरन पूर्ण केल्या. यासाठी त्यांना डॉ. चंद्रशेखर साखरे, डॉ. चारुलता साखरे, डॉ. सतीश काटे, डॉ. दीपाली काटे, डॉ. संतोष सुर्वे, डॉ. सायली सुर्वे, कै. डॉ रसिकलाल मेंढापूरकर, सरिता मेंढापूरकर, डॉ. दिनेश कदम, डॉ. राजेंद्र दास, आर्किटेक्‍ट शरदचंद्र भोसले, प्रा. प्रमोद शहा, संजय साळवे, दास गोरे यांचे सहकार्य लाभले. 

त्याचबरोबर त्यांना नाटकांचीही आवड असल्याने मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमी, युवक बिरादरी, शिवगिरिजा प्रतिष्ठान, वेध, शोध या संस्थांची जवळपास 50 हून अधिक एकांकिका व नाटकांची प्रकाश योजना त्यांनी सांभाळली आहे. त्याच वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळली. मुलगा रविराज हे पुण्यात तर मुलगी प्रियदर्शनी वैभव डुबेपाटील (सध्या अमेरिका) हे दोघेही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पदांवर काम करत आहेत. श्री. जाधव यांनी नोकरीच्या काळात तांत्रिक विषयाची विविध व्याख्याने दिली आहेत. त्यांना भ्रमंतीची विशेष आवड असल्याने भारतातील बहुतांश भागांबरोबर युरोपातील देश व अमेरिकेतील काही भागांमध्ये त्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला आहे. आरोग्य व फिटनेससाठी व्यायाम, चालणे, धावणे आवश्‍यक असून लॉकडाउनमुळे बंद असलेल्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहात असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com