कोरोनामुक्तीसाठी मंगळवेढा तालुक्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तालुक्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तुटपुंज्या साधन सामग्रीवर नागरिकांच्या सरंक्षणासाठी दिलेला लढा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी केले.

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी तालुक्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तुटपुंज्या साधन सामग्रीवर नागरिकांच्या सरंक्षणासाठी दिलेला लढा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी केले.

आमदार भारत भालके यांच्या स्थनिक विकास निधीतून तालुक्यातील आरोग्य विभागास 25 लाखाचे अत्यावश्यक उपकरणे, पीपीई किट व इतर साहित्य देण्यात आले. कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकारी यांना याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद शिंदे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, रामचंद्र वाकडे, लतीफ तांबोळी, सुनिल डोके, भारत नागणे, प्रविण खवतोडे, सचिन शिंदे, महादेव जाधव, युवराज घुले, मुझ्झमिल काझी, संदीप बुरूकूल, संगिताताई कट्टे, रावसाहेब फटे, अशोक माने यांच्यासह डॉक्टर, सेविका, आशा वर्कर्स उपस्थित होते. आमदार भालके म्हणाले, मंगळवेढ्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त पदांच्या भरती बाबतीत तात्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून तालुक्यात रक्तपेढीची आवश्यकता असून रूग्ण तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक मशीन, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नवीन पोस्टमार्टम रूम बांधणे करिता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी बोलताना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले म्हणाले, कोरोना लढाईच्या संकटात आमदार भालके यांनी अडचण पडेल त्यावेळेला सहकार्य केले असून लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि जनतेचे सहकार्य यामुळे आता पर्यंत कोरोनामुक्त राहिलो आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight given by administration officials in Mangalvedha taluka for the release of Corona is commendable