बार्शीत शनिवारी सकाळी पोलिस कर्मचाऱ्यासह पाच जण कोरोनाबाधित; तालुक्‍यातील रुग्णांची एकूण संख्या 46 

प्रशांत काळे
शनिवार, 27 जून 2020

20 अहवाल प्रलंबित 
बार्शी शहरातील 11, वैराग येथील एक, चिंकहिल (कुर्डुवाडी) येथील एक, उपळाई ठोंगे येथील तीन, अरणगाव येथील 3, घाणेगाव एक असे 20 अहवाल प्रलंबित आहेत. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित पाच जणांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला असून यामध्ये शहरातील तीन जण, साकत पिंपरी येथील एक जण तर बार्शीतील पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तालुक्‍यातील बाधित रुग्णांची संख्या 46 झाली असून अद्याप 20 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. 
शनिवारी सकाळी तालुक्‍यातील दहा अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी बार्शी येथील आठ जणांपैकी तीन जण, साकत पिंपरी येथील एक व सीना दारफळ येथील एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. बार्शी शहरातील 11, वैराग येथील एक, चिंकहिल (कुर्डुवाडी) येथील एक, उपळाई ठोंगे येथील तीन, अरणगाव येथील 3, घाणेगाव एक असे 20 अहवाल प्रलंबित आहेत. बार्शी शहरातील आज बारंगुळे प्लॉट, पाटील प्लॉट, नागणे प्लॉट येथील प्रत्येकी एक असे तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या भागातील नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. प्रत्येकाची तपासणीचे काम सुरु केले आहे. वैराग व जामगाव येथील प्रत्येक एक असा दोन जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला असून कोविड केअर सेंटरमध्ये 17, खासगी रुग्णालयात तीन अशा 20 जणांवर उपचार सुरु आहेत. साकत पिंपरी येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच आरोग्य प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कातील त्या भागातील नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. अशी माहिती डॉ.जोगदंड यांनी दिली. 
दरम्यान, बार्शी शहरातील वाणी प्लॉट, सोलापूर रोड, आरएसएम हाईटस्‌, गाडेगाव रोड, उपळाई रोड या भागात आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Corona infected including Barshi police personnel total patient 46