"या' वीज उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; विस्कळीत वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण 

Electricity
Electricity

केत्तूर (सोलापूर) : गेल्या तीन महिन्यात पश्‍चिम भागातील पारेवाडी (ता. करमाळा) येथील पाच एमव्हीचा ट्रान्सफार्मर दुसऱ्या वेळेस जळाला असून, गेल्या 20 दिवसांपासून येथील शेतकऱ्यांना शेती पंपाचा वीजपुरवठा चारच तास होत आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला थोडाफार समाधानकारक पाऊस झाला असला तरी आता मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे.त्यामुळे शेतकरी उसाला रासायनिक खताची मात्रा देत आहेत. परंतु, नदीत पुरेसा पाणीसाठा असून देखील केवळ चार तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना खताची मात्रा व पाणी देणे अशक्‍य झाले आहे. 

या वीज उपकेंद्रावर प्रामुख्याने केत्तूर नंबर 2, पारेवाडी, हिंगणी, दिवेगव्हाण, पोमलवाडी, राजुरी आदी गावांतील शेतकऱ्यांना वीजपुरवठा होतो. यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली पण या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले आहे. दिवेगव्हाण व राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून नदीवरून पाइपलाइन केले आहेत. मात्र या वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे त्यांच्या उत्पादनात कमालीची घट होत असून, या शेतकऱ्यांना बॅंकेच्या व्याजाचे हप्ते भरणेही मुश्‍कील झाले आहे. करमाळा तालुक्‍यासह शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणारा हा उजनीचा पट्टा असून, हे क्षेत्र करमाळा तालुक्‍यातील उसाचे आगार म्हणून ओळखले जाते. अंबालिका शुगर, कर्जत ते बारामती ग्रो व संगमनेर येथील साखर कारखाने या भागातून ऊस नेतात. 

या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून, अगोदरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी उसाला किती दर मिळेल? या चिंतेत शेतकरी असताना ऊस उत्पादनात घट होण्याचीही भीती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. कर्मचाऱ्यांचा अभाव, जुन्या व जीर्ण तारा, अतिरिक्त भार यांसारख्या काही प्रमुख समस्यांनी या वीज उपकेंद्राला ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर ट्रान्सफार्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत असून, त्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची तयारी आता शेतकऱ्यांना करावी लागेल, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. 

केत्तूरचे शेतकरी शहाजी पवार म्हणाले, उजनी लाभक्षेत्रातील हे महत्त्वाचे सबस्टेशन (उपकेंद्र) असतानाही येथे कायमस्वरूपी अधिकारी नाहीत. तसेच बहुतांश गावांमध्ये वायरमनही नाही. त्यामुळे छोटी छोटी कामेही "झिरो वायरमन'कडून चिरीमिरी देऊन करावी लागत आहेत 

याबाबत करमाळा महावितरणचे उपअभियंता सुमीत जाधव म्हणाले, बिघाड झालेल्या ट्रान्सफार्मरचे ऑइल काढण्याचे काम आज चालू असून, ते ऑईल दुरुस्त झालेल्या ट्रान्सफार्मरमध्ये भरल्यानंतर ट्रान्सफार्मर बसवला जाईल. आम्ही यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून लवकरच आम्ही शेतीपंपासाठी आठ तास वीजपुरवठा करणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com